महाराष्ट्रविदर्भ

सरकारी पैशात मैदान, मुरुम मात्र, चोरीचा

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

मंगरुळपीर तालुक्यातील नांदखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या क्रिडांगण विकासाच्या कामासाठी चोरीचा मुरुम वापरल्याची तक्रार होताच महसूल व वनविभागाने स्पॉट चौकशी करून खळबळ उडवली आहे. वार्षिक क्रीडांगण अनुदान योजना 2024-25 अंतर्गत हे मैदान विकसित करण्याचे काम सुरू असून, त्यात अवैधरित्या मिळवलेले गौणखनिज वापरल्याचा आरोप बळावत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदखेडा येथील शाळेच्या नव्या इमारतीच्या आवारात 10 ते 15 ब्रास इतका गौणखनिज सदृश्य रॉ मटेरियल आणि 35 ते 40 ब्रास मुरुम आढळून आला. 30 मे 2025 रोजी महसूल पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. चौकशीत असे समोर आले की काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने गावातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून त्यातून निघालेले रॉ मटेरियल येथे टाकले. मात्र, मुरुमाच्या बाबतीत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हा मुरुम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावानुसार मैदानाच्या कामासाठी ठेकेदाराने आणलेला आहे.

आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, ठेकेदाराने हा मुरुम नेमका कुठून आणला? त्यासाठी कायदेशीर रॉयल्टी भरली का? किती ब्रास मुरुम वापरला गेला आणि त्याची नोंद आहे का? याची सविस्तर चौकशी महसूल विभागाकडून सुरू आहे. दोषी ठरल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

चोरीचा मुरुम वनविभागाचा की महसुलचा?

या प्रकरणात आणखी एक महत्वाचा संशय पुढे आला आहे. हा मुरुम वनविभागाच्या हद्दीतील आहे का? कारण शाळेजवळील वनक्षेत्रालगतच अवैध उत्खनन झाल्याचे पुरावे आढळले आहेत. जिथून मुरुम काढला गेला ती जागा वनविभागाच्या ताब्यात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, याबाबत अधिकृत खात्री करण्यासाठी महसूल विभागाकडून वनविभागाकडे अहवाल पाठवला जाणार आहे. जर हा मुरुम महसुलच्या क्षेत्रातून नसेल, तर तो निश्चितच वनक्षेत्रातील चोरीचा असू शकतो, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

कारवाईकडे सर्वांचे लक्ष…

गौणखनिज चोरीच्या तक्रारीवर महसूल विभागाने झटपट चौकशी सुरू केल्याने स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. ठेकेदारावर थेट गुन्हा दाखल होणार की ग्रामपंचायतीलाही जबाबदार धरले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, सरकारी योजनेतून मिळालेल्या निधीतून विकासकाम करताना अवैध खनिज वापरल्यास ही गंभीर कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.

सध्या महसूल आणि वनविभाग दोन्ही पथके मिळून पुरावे गोळा करत असून, स्पॉटवरील निरीक्षणानुसार अवैध मुरुम उत्खनन झाल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, तो कोणाच्या हद्दीतील आहे, हे ठरल्यावरच पुढील कारवाईला वेग येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही