सलगरेची सिद्धेश्वर यात्रा उत्साहात; पारंपरिक जल्लोषात पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | मिरज तालुक्यातील सलगरे येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची बहुप्रतीक्षित यात्रा यंदाच्या वर्षी परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वैभवाने परिपूर्ण अशा उत्साही वातावरणात पार पडणार आहे. ४ ते ८ डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत रंगणाऱ्या या यात्रेची तयारी सलगरे गावात जोमात सुरू असून संपूर्ण परिसर यात्रामय झाला आहे. तानाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या यात्रेचे हे अकरावे वर्ष असल्याने गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणारा मानाच्या अकरा पालख्यांचा सोहळा यंदाही मोठ्या थाटामाटात होणार आहे. सलगरेच्या मुख्य चौकात होणाऱ्या या ऐतिहासिक भेटीसाठी आसपासच्या गावांतील हजारो भाविक सलगरे येथे दाखल होणार आहेत. टाळ-चिपळ्यांचे निनाद, भक्तिगीते, ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे. दरवर्षीप्रमाणे या सोहळ्याने यात्रेच्या वैभवात भर घालण्याचे काम केले असून, यंदाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यात्रेच्या नियोजनासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष व माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. यात्रेची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि कार्यक्रमांचे वेळापत्रक यावर सविस्तर चर्चा झाली. गावातील प्रमुख चौक, मंदिर परिसर आणि मुख्य रस्ते दिव्यांच्या रोषणाईने सजवले जात असून, मोठे आकाशपाळणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, खेळणी आणि विविध ग्रामीण उत्पादनांचे स्टॉल्स सजू लागले आहेत. यात्रेचा परिसर गजबजाटाने फुलून आला आहे.
यात्रेतील कार्यक्रमांची जाहीर केलेली रूपरेषा भाविकांना आकर्षित करणारी आहे. ४ डिसेंबर रोजी महारुद्राभिषेकाने यात्रेला धार्मिक मंगलारंभ होणार असून रात्री लोकनाट्य तमाशा रंगणार आहे. ५ डिसेंबर रोजी सकाळी तमाशा, दुपारी गुग्गुळाचा कार्यक्रम आणि सायंकाळी पारंपरिक गोंधळ होणार आहे. ६ डिसेंबर रोजी पुरणपोळीचा नैवेद्य, भजनांचा सोहळा आणि रात्री आर्केस्ट्राचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. ७ डिसेंबर हा यात्रेचा शिरपेच ठरणारा दिवस. दुपारी चार वाजता मानाच्या अकरा पालख्यांची भव्य भेट होणार असून, सायंकाळी माणिक आरती आणि रात्री धनगरी ओव्यांचा जागर सोहळा उत्साहाला उधाण आणणार आहे. ८ डिसेंबर रोजी विविध स्पर्धा आणि लावणीचा बहारदार कार्यक्रम यात्रेचा समारोप आकर्षक बनवणार आहे.
“सिद्धेश्वर यात्रेत गावातील प्रत्येक हात लागतो. भाविकांनी सुरक्षिततेचे भान ठेवून सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. असे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी सर्व भाविकांना केले आहे.
यात्रेच्या तयारीत सर्जेराव पाटील, राजाराम अजेटराव गुरुजी, शिवाजी माळी, देवकर काका, अंकुश एकुंडे, गजानन गुंडेवाडी, रमेश भोसले, रमेश खरात, सचिन निंबाळकर यांसारख्या मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सलगरेची सिद्धेश्वर यात्रा ही श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक असून यावेळीही पंचक्रोशीतील भाविकांना भक्तिभावाचा अनोखा अनुभव देणार आहे.