महाराष्ट्रराजकीय

सांगलीत शिवसेना अंगीकृत संघटनांची शक्तीप्रदर्शनासाठी 14 डिसेंबरला व्यापक बैठक

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | श्रीकांत यमगर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रणित अंगीकृत संघटनांनी सांगलीत शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. यानिमित्त रविवारी, दिनांक 14 डिसेंबर रोजी सांगली येथे व्यापक जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस शिवसेना ओबीसी–व्हीजेएनटी सेना, शिवसेना बांधकाम कामगार सेना आणि शिवसेना राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख विक्रम चव्हाण, शरद यमगर आणि बापूसाहेब देशमुख यांनी केले आहे.

बैठकीच्या नियोजनासाठी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सर्किट हाऊस येथे पार पडली. यावेळी श्रीकांत यमगर, विजय माळी, राहुल तोरणे, श्रीकांत कोष्टी, विनय कोळी, सागर वडार, विनोद ठोंबरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नियोजन बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनांच्या भूमिका, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांचे संघटनात्मक बळ आणि संघटनांची ताकद दाखवण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये अंगीकृत संघटनांना अपेक्षित स्थान न देण्यात आल्याबद्दल अनेक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याने असंतोष वाढल्याचे सर्वांनी एकमुखाने नमूद केले. या पार्श्वभूमीवर 14 डिसेंबरची सांगलीतील बैठक भव्य, ताकदीची आणि संघटनांच्या बांधिलकीची ठोस जाणीव करून देणारी व्हावी, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

अंगीकृत संघटनांच्या एकजुटीचे आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीतून निर्माण झालेल्या वातावरणाचे उत्तर म्हणून ही बैठक निर्णायक ठरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रविवारची व्यापक बैठक आगामी निवडणुकीत शिवसेना अंगीकृत संघटना किती सज्ज आहेत, हे दाखवणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही