सांगली एलसीबीची मोठी कारवाई ; कवठेमहांकाळ घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद; ; ७.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल ७ लाख ८० हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रविण विठ्ठल निकम (वय ३२, रा. कुची, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एलसीबी पथकाने केलेल्या तपासात घरफोडीतील संपूर्ण चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ता. ८ रोजी सकाळी ५.३० ते ता. ९ रोजी सकाळी ६.०० वाजण्याच्या दरम्यान कुची गावातील सौ. सुरेखा आण्णासो पाटील यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी केली होती. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडे सोपवला.
एलसीबी पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे व अमीरशहा फकीर यांना गोपनीय माहिती मिळाली की, ग्रे रंगाचा टी-शर्ट घातलेला एक संशयित इसम तानंग फाटा चौक परिसरात सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी फिरत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून संशयित प्रविण निकम याला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले. अधिक चौकशी केली असता आरोपीने कबुली दिली की, कुची गावातील फिर्यादी हे बाहेरगावी जाताना घराची चावी नेहमी ज्या ठिकाणी ठेवतात, त्या जागेची माहिती असल्याने त्याने ३ ते ४ दिवसांपूर्वी चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले.
पोलिसांनी आरोपीकडून एकूण ७ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सोन्याचे गंठण, लक्ष्मी हार, मिनी गंठण, सोन्याची अंगठी तसेच चांदीचे दिवे व जोडव्यांचा समावेश आहे. जप्त केलेला आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे, सागर लवटे, अमीरशहा फकीर, नागेश खरात, अनिल कोळेकर, महादेव नागणे, सागर टिंगरे, सतीश माने, संदीप गुरव, दरिबा बंडगर, मच्छिद्र बर्डे, उदय माळी, विक्रम खोत, केरबा चव्हाण तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अभिजीत पाटील यांनी संयुक्तपणे केली.