रजेवरचा ग्रामसेवक ; दप्तरावर डल्ला

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | खटाव ग्रामपंचायतीत १५ ऑगस्टच्या पवित्र दिवशी गुप्त भ्रष्टाचाराचा खेळ उघडकीस आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदन सोहळ्याला गावकऱ्यांची गर्दी जमली असताना, ग्रामपंचायत कार्यालयाच्या आत मात्र, दप्तराचा घोटाळा आणि पुरावे नष्ट करण्याची भयानक खेळी रचली जात होती.
रजेवर असलेले आणि चौकशीत दोषी ठरलेले ग्रामसेवक संजय गायकवाड ज्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार लटकत आहे. यांनी या दिवशी सरळ ग्रामपंचायत कार्यालयात हजेरी लावली. आणि हास्यास्पद म्हणजे, चार्ज ग्रामसेवक मधूकर सरगर यांच्या ताब्यातील दप्तर हे थेट रजेवरच्या गायकवाड यांच्या हवाली झाले. सरपंच रावसाहेब बेडगे आणि सरगर यांच्या संगणमताशिवाय हा प्रकार घडणे अशक्य असल्याचे ग्रामस्थ उघडपणे बोलत आहेत.
ग्रामपंचायतीचे दप्तर हे गावाच्या कारभाराचे आरसे आहे. त्या आरशावरच घाण फासून स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्याचा हा निर्लज्ज प्रयत्न होता. रजेवर असलेल्या गायकवाड यांना दप्तर पाहण्याचा कसला अधिकार? वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी नसताना हा प्रकार कसा काय घडला? हे प्रश्न आता गावकऱ्यांच्या रोषाचे केंद्र झाले आहेत.
याहून लाजिरवाणी बाब म्हणजे, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वजाला वंदन करून गायकवाड यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दबावाखाली कार्यालयात थांबवले. ग्रामदप्तराचा अपहार ही गुन्हेगारी ग्रामस्थ कधीही सहन करणार नाहीत. भ्रष्टाचार वाचवण्यासाठी दप्तराला सलाम करणारे सरपंच व ग्रामसेवक गावाच्या नजरेत आता काळे चेहरे ठरले आहेत.
तक्रारदार परशुराम बनसोडे यांनी या प्रकाराची तात्काळ माहिती गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली असून, सोमवारी अधिकृत निवेदनासह गायकवाड दप्तर तपासणी करत असल्याचा थेट व्हिडिओ पुरावा सादर केला जाणार आहे. या प्रकरणात सरपंच रावसाहेब बेडगे, ग्रामसेवक सरगर आणि रजेवर असूनही दप्तर खेळवणारे गायकवाड या तिघांवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.