
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
‘खाकी’ वर्दीला पूर्वीप्रमाणेच आजही मान आहे; मात्र काळ बदलत असताना पोलिसांविषयी जनतेच्या मनात काही प्रमाणात नकारात्मकता निर्माण झाल्याचे दिसते. अशा वातावरणातही माणुसकी जपत, कर्तव्यनिष्ठेने काम करणारे अधिकारी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतात. मंगरुळपीरचे ठाणेदार किशोर शेळके हे त्यापैकीच एक ठाम आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
दि. २६ मे २०२५ रोजी त्यांनी मंगरुळपीर पोलीस ठाण्याची धुरा स्वीकारली. पदभार स्वीकारताच त्यांनी केवळ कार्यालयीन कामापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता थेट जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली. स्थानिक समस्या जाणून घेऊन त्या मुळापासून सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चोरी, मारामारी, अवैध धंदे किंवा सामाजिक तणावाची घटना असो ठाणेदार शेळके घटनास्थळी स्वतः उपस्थित राहून परिस्थिती हाताळणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या कार्यकाळात परिसरातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले आहे. नियमित पेट्रोलिंग, रात्रीची गस्त, संशयितांवर नजर आणि माहिती संकलनाची सक्षम यंत्रणा उभी करून त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य दिले. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हा होऊच नये यासाठी प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे, हा त्यांचा ठाम विश्वास आहे.
विशेषत: चोरी, घरफोडी, अवैध दारूविक्री, जुगार व वाळू चोरी यांसारख्या प्रकारांवर त्यांनी कठोर कारवाई केली. अचानक छापे, मुद्देमाल जप्ती आणि गुन्हे नोंदींमुळे अवैध व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला. कायद्याचा धाक निर्माण करताना त्यांनी कुणालाही पाठीशी न घालता “कायदा सर्वांसाठी समान” हे तत्व प्रत्यक्षात आणले.
कौटुंबिक वाद, शेजारी भांडणे किंवा किरकोळ तणावाच्या प्रकरणांत त्यांनी समेटाचा मार्ग स्वीकारून अनेक वाद शांततेने मिटवले. त्यामुळे सामाजिक सलोखा टिकून राहिला. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि योग्य मार्गदर्शन करणे ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
महिला व ज्येष्ठ नागरिकांबाबत त्यांनी विशेष संवेदनशीलता दाखवली आहे. महिलांवरील अत्याचार किंवा छळाच्या प्रकरणांत तातडीने कारवाई तर केलीच, पण कायदेशीर मार्गदर्शनही केले. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींसाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले ही माणुसकीची जाणीव विशेष ठरते.
युवक व विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, सायबर गुन्हे, वाहतूक नियम याविषयी जनजागृती कार्यक्रम राबवून त्यांनी समाजप्रबोधनाची भूमिकाही पार पाडली आहे. सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि टीमवर्कची भावना निर्माण करून संपूर्ण पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी केली आहे.
साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, कठोर शिस्त आणि तरीही माणुसकीची जाणणाऱ्या गुणांचा सुरेख संगम म्हणजे ठाणेदार किशोर शेळके. गुन्हेगारांबाबत कठोर, तर निरपराध नागरिकांबाबत सहानुभूतीशील अशी त्यांची भूमिका आज मंगरुळपीरवासीयांसाठी विश्वासाचा आधार बनली आहे.