सामाजिक उपक्रमांतून फडणवीसांना शुभेच्छा

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा लोकप्रिय नेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिम जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. भाजपा जिल्हा यंत्रणेच्या पुढाकाराने मंगरुळपीर, कारंजा-मनोरा, रिसोड-मालेगाव या मतदारसंघातील १६ मंडळांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये तब्बल ७०० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक रक्तदात्याला भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या स्वाक्षरीचे आभार पत्र देण्यात आले. समाजभान जागृत करणाऱ्या या उपक्रमाबरोबरच पर्यावरणपूरक विचारांची जपणूक करत ११०० वृक्षांचे वृक्षारोपण विविध ठिकाणी करण्यात आले. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरुळपीर भागात शिवलिंग पूजन, जलाभिषेक, महाआरती अशा धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन झाले.
काही मंडळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप, क्रीडा स्पर्धा, महिला सहभागासाठी विशेष कार्यक्रम, तसेच भाजपा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अशा अनेक उपक्रमांनी या दिनाचे औचित्य साधण्यात आले. वाशिम शहरातील मुख्य रुग्णालयात रुग्णांसाठी फळवाटपाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय, वाशिम येथील संमती इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये राज्य शासनाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, ज्यात विविध कंपन्यांनी सहभाग घेतला आणि स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कोअर टीमचे सदस्य, माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती पदाधिकारी, भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी, सर्व १६ मंडळांचे अध्यक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
या कार्यक्रमांसाठी भाजपा पदाधिकारी, बूथप्रमुख, महिला कार्यकर्त्या, तरुण मंडळांचे स्वयंसेवक, रक्तदाते, व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. अनेक सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक मंडळांनीही या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.
या सर्व कार्यक्रमांची आखणी, अंमलबजावणी आणि यशस्वी आयोजनासाठी भाजपा जिल्हा यंत्रणेकडून विशेष परिश्रम घेण्यात आले असून जिल्हा भाजपा तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले आहेत.