मांजरा-तेरणा नदीपात्रात वाळू तस्करी ; महसूल, पोलिस प्रशासनाचे मौन

LiVE NEWS | UPDATE
लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
निलंगा व देवणी तालुक्यातील औराद शहाजानी, गिरकचाळ, शिऊर व धनेगाव परिसरातील मांजरा व तेरणा नदीपात्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा होत असल्याचे उघड झाले आहे. बोटी, ट्रॅक्टर, हायवा व जेसीबींच्या सहाय्याने रात्रीच्या अंधारात हा गोरखधंदा सुरू असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. महसूल व पोलिस विभाग मात्र या सर्व प्रकाराकडे मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याची चर्चा स्थानिकांतून केली जात आहे.
रात्रीच्याच अंधारात वाळू उपसा
शासनाची कोणतीही परवानगी नसताना नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकदा पकडलेली वाहने पुन्हा तस्करीसाठी वापरली जात असल्याने कारवाई किती प्रभावी आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामागे संबंधित अधिकारी व स्थानिक वाळू माफियांची संधि असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
१५ सप्टेंबरपासून आमरण उपोषण
या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी १५ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.
*उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या :*
◆ संयुक्त विभागीय पथकाची तात्काळ कारवाई.
◆ सर्व बेकायदेशीर वाहने जप्त करणे.
◆ वाळू माफियांवर कठोर गुन्हे दाखल करणे.
◆ संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व निलंबनाची कारवाई.
◆ संपूर्ण नदीपात्रात अवैध उपसा बंद करणे.
प्रशासनाकडे उदासीनतेचे आरोप
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही. पावसाळ्यातदेखील वाळू उपसा सुरू असल्याने शासनाच्या खनिज संपत्तीवर अब्जावधी रुपयांचा डाका टाकला जात आहे. त्यामुळे महसूल व पोलिस प्रशासनाची निष्क्रियता की त्यांची मूक संधि, हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.
वाळू माफियांवर कठोर कारवाईची मागणी
या तस्करीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे वाळू तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाने तात्काळ पावले उचलून अवैध वाळू तस्करी थांबवावी, अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.