सावधान ! धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई अटळ ; ठाणेदार शेळके यांचा स्पष्ट इशारा
मंगरुळपीर शहरातील समन्वय बैठकीत महत्त्वाचा निर्णय, परवानगीशिवाय भोंगे लावणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मंगरुळपीर | धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हा गेल्या काही काळापासून चर्चेचा व वादाचा विषय बनला असून, आता पोलिस प्रशासनाने यावर कडक पवित्रा घेतला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, राज्यभरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये समन्वय बैठका आयोजित केल्या जात आहेत. अशाच एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन मंगरुळपीर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आले.

ठाणेदार किशोर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शहरातील विविध धर्मीय प्रार्थनास्थळांचे मौलाना, विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे, त्यांची परवानगी, वापरातील नियम व कायदेशीर अडचणी यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
ठाणेदार शेळके यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, धार्मिक स्थळांवर परवानगीशिवाय लावले गेलेले भोंगे तात्काळ हटविण्यात येतील. यासंदर्भात पूर्वसूचना देण्यात येत असून, जर कोणत्याही प्रार्थनास्थळी परवानगीशिवाय भोंगे आढळले, तर त्यांना पोलिसांकडून जप्त करण्यात येईल. तसेच संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई अटळ आहे.

यावेळी मुस्लिम समाजाच्या मौलानांसोबत स्वतंत्र चर्चा करण्यात आली. धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घेत प्रशासन संवादाच्या माध्यमातून मार्ग काढत आहे. सर्वच समाजघटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
भोंग्यांसाठी ठरवलेले वेळ व डेसिबलचे नियमही यावेळी स्पष्ट करण्यात आले. रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळावर भोंगे वाजवण्यास बंदी असेल. सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा अधिक नसावा, तर रात्री ४५ डेसिबलची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
या बैठकीत सर्व उपस्थित विश्वस्त आणि धार्मिक नेत्यांनी पोलिस प्रशासनास सहकार्याचे आश्वासन दिले. सामाजिक सलोखा राखत, कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी, असा सूर देखील बैठकीत उमटला.
पोलिसांच्या या पावलामुळे शहरातील नागरिकांत एक सकारात्मक संदेश गेला असून, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.
“परवानगीशिवाय भोंगे वाजवले, तर कारवाई अटळ! धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांचा बंदोबस्त होणारच” ठाम इशारा देत मंगरुळपीर पोलिस प्रशासन पुढाकार घेत आहे.
