सावरगाव रस्ता उखडला ; जनतेचा संताप उसळला
डांबरीकरणाच्या नावाखाली लूट ; गुत्तेदार व अभियंते रडारवर

LiVE NEWS | UPDATE
लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
देवणी प्रतिनिधी | देवणी तालुक्यातील सावरगाव पाटी ते सावरगाव रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नव्याने केलेले डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून, रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरला आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून लातूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे ठरले आहे.
तांत्रिक निकषांचा फज्जा – सरळ मातीवर डांबर
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्ता तयार करताना जागेची योग्य दबाई करण्यात आलेली नाही. सरळ मातीवरच डांबरीकरण करून केवळ कागदोपत्री काम पूर्ण दाखवले गेले. याशिवाय डांबरात केमिकलयुक्त भेसळ आढळून आल्याचेही प्राथमिक निरीक्षणातून समोर आले आहे. परिणामी, रस्त्याची गुणवत्ता पूर्णतः ढासळली असून, अवघ्या काही आठवड्यांतच संपूर्ण मार्ग धोकादायक बनला आहे.
अधिकाऱ्यांची गाफील भूमिका ; चौकशीची मागणी
या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता (उदगीर विभाग) यांची जबाबदारी ठरवण्यात येत आहे. नागरिकांनी मागणी केली आहे की, दोषी गुत्तेदार व संबंधित अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी करून कठोर कारवाई केली जावी.
समितीचा इशारा – आंदोलनाची तयारी सुरू
या संपूर्ण प्रकारामुळे “अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती”चे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,
“या रस्त्याचे काम म्हणजे भ्रष्टाचाराचा जिवंत पुरावा आहे. दोषींवर चौकशी करून कठोर कारवाई झाली नाही, तर समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
समितीने प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत उपाययोजना न झाल्यास रास्ता रोको, उपोषण, कार्यालयांना घेराव अशा स्वरूपाचे आक्रमक आंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.