सुनिताताई नाईक यांची बिनविरोध सरपंचपदी निवड

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | वड्डी गावच्या राजकारणात पुन्हा एकदा एकमुखी निर्णयाची नोंद झाली असून वड्डी ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सौ. सुनीताताई मारुती नाईक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची औपचारिकता पूर्ण होताच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, पेढे वाटत जल्लोष साजरा केला.

आज ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्यांची विशेष बैठक पार पडली. बैठकीस मिरज पंचायत समिती चे विस्ताराधिकारी शिवानंद कोळी व ग्रामसेविका शितल जाधव यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. प्रभारी सरपंचपदासाठी केवळ सौ. सुनीताताई नाईक यांचाच अर्ज आल्याने त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. निर्णय जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत स्वागत केले.
निवडीनंतर बोलताना सुनीताताई नाईक यांनी ठाम शब्दांत सांगितले की, वड्डी ग्रामपंचायतीतील अपूर्ण कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, स्ट्रीट लाईट आदी मूलभूत सुविधा तात्काळ पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्य व ग्रामस्थांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक क्षणी मिरज संस्थान चे राजेसाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज, युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज व युवराणी अनुसयाराजे पटवर्धन महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा नाईक, रमेश नाईक, पुष्पाताई मगदुम, अभिषेक मगदुम, पुष्पाताई येसुमाळी, चंद्रकांत खोबरे, जयश्री मगदुम, राकेश वाघमारे, वर्षा वाघमारे यांच्यासह तरुण वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील राजकीय एकोप्याचे दर्शन या निवडीमधून घडले. कोणताही वाद न होता बिनविरोध निवड झाल्याने वड्डीत समाधानाचे वातावरण आहे. आगामी काळात ग्रामविकासाच्या आघाडीवर ठोस निर्णय घेत गावाचा चेहरामोहरा बदलण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.