स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा बिगुल वाजलं ! नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेनंतर संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणुका जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यांची बैठक, प्रचाराची आखणी, तिकिटांसाठी धावपळ या साऱ्याला आता वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
👉🏻 नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत : १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर
👉🏻 अर्जांची छाननी : १८ नोव्हेंबर
👉🏻 अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २१ नोव्हेंबर
👉🏻 अंतिम उमेदवारांची यादी : २५ नोव्हेंबर
👉🏻 मतदानाचा दिवस : २ डिसेंबर
👉🏻 मतमोजणी व निकाल जाहीर : ३ डिसेंबर
| राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिलीप वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणुका पारदर्शक, शांततेत आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. प्रत्येक मतदाराने लोकशाहीचा हा सण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. |
या निवडणुकांमधून स्थानिक पातळीवर नवे नेतृत्व उदयास येणार असून, विकासाचे नवे आराखडे आणि राजकीय समीकरणांमध्ये बदल दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व प्रमुख पक्ष शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व वंचित बहुजन आघाडी यांनी उमेदवार निवडीची प्रक्रिया गतीमान केली आहे.
ही निवडणूक फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची नसून, राज्यातील राजकीय भविष्याचा दिशादर्शक ठरणार आहे. मतदारांच्या अपेक्षा, विकासाच्या घोषणा आणि नव्या चेहऱ्यांची झुंज यामुळे २ डिसेंबरला महाराष्ट्रात लोकशाहीचा मोठा सण साजरा होणार आहे.