महाराष्ट्र

फोनवर दादांचे फर्मान ; कायदा ठरला खेळण्यासमान, ग्रामस्थ गुन्हेगार ; दादा मात्र, महान

सोलापूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

राज्यातील उपमुख्यमंत्री म्हणून गाजावाजा करीत स्वतःला शिस्तप्रिय, कठोर आणि नियमांवर चालणारा नेता म्हणून अजित पवार यांची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडलेल्या घटनेने या प्रतिमेला मोठे तडे दिले आहेत. गावकऱ्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणावरुन घडलेल्या वादातून पवारांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवर दादागिरीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

फोनवर दादागिरी, व्हिडिओ व्हायरल

कुर्डू गावातील शेतजमिनीतून अवैध मुरूम उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अंजना कृष्णा यांनी धाड टाकली. कारवाईला सुरुवात होताच ग्रामस्थ संतप्त झाले. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बाबा जगताप याने थेट अजित पवारांना फोन लावला आणि तो फोन अंजना कृष्णा यांच्या हाती दिला. सुरुवातीला त्यांना आवाज ओळखता आला नाही, पण पवारांनी दोनदाच ठणकावले मी अजित पवार बोलतोय, कारवाई थांबवा, माझा आदेश आहे.

पवारांच्या आवाजातील ती चीडचीड, अहंकार आणि बडेजाव संपूर्ण देशाने पाहिला. तुम्ही मला ओळखत नाही? माझा चेहरा ओळखणार नाही? मी कारवाई करीन तुमच्यावर अशा थेट धमक्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला पवार देताना व्हिडिओकॅमेरात कैद झाले. ही क्लिप सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली आणि विरोधकांनी पवारांवर टीकेची झोड उठवली.

गावकऱ्यांवर गुन्हे, दादांवर नाही?

या प्रकरणाचा निकाल काय झाला? अपेक्षेप्रमाणे अजितदादांवर कसलीही कारवाई नाही. उलट, दादांना फोन लावणारे व कारवाई अडवणारे ग्रामस्थ मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकले. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 371/2025 अन्वये सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यात 15 ते 20 जणांचा समावेश असून त्यात बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांची नावे आहेत. फिर्याद ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी दिली. त्यात पर्यावरण संरक्षण कायदा, बी.एन.एस. कलम 303(2), 3(5) आदी कलमे लावण्यात आली आहेत.

गावातील दादाराव गोरख माने यांच्या शेतजमिनीतून अंदाजे 120 ब्रास मुरूम (किंमत 72 हजार रुपये) बेकायदेशीररीत्या उपसल्याचा आरोपही या ग्रामस्थांवर ठेवण्यात आला. म्हणजेच गावकरी आरोपी, शेतकरी आरोपी, पण फोनवर आदेश देणारे उपमुख्यमंत्री मात्र ‘निर्दोष’

घटनास्थळी तीन तास तणाव

या घटनेच्या वेळी गावात चांगलाच गदारोळ झाला होता. अंजना कृष्णा यांनी कारवाई सुरू केली असता ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. ग्रामपंचायतीची परवानगी असल्याचा दावा ग्रामस्थ करत होते, पण त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे दाखवण्यात आली नाहीत. त्यामुळे कारवाई सुरूच राहिली.

दरम्यान, अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यातील संवाद तणावग्रस्त होता. महिला पोलीस अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या, मात्र अजित पवारांची भाषा दबंग होती. “मी आदेश देतो, कारवाई थांबवा!” या गर्जनेतून त्यांचा स्वभाव पुन्हा एकदा उघड झाला.

घटनेदरम्यान तब्बल तीन तास पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये तणाव होता. अखेर कारवाई सुरूच राहिली, पण नंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे दादागिरीचे वारे राज्यभर पसरले.

दादा की ‘लोकशाही’ ?

या संपूर्ण प्रकारातून एक गंभीर प्रश्न उभा राहतो. राज्यातील उपमुख्यमंत्री जर थेट फोनवर महिला पोलीस अधिकाऱ्याला खडे बोल सुनावून कारवाई थांबवण्याचे आदेश देत असतील, तर हा कायद्याचा विजय की दादागिरीचा? गावकऱ्यांवर गुन्हे दाखल होतात, पण आदेश देणाऱ्यांना कुठलीच कारवाई लागू नये, हीच खरी दुर्दशा आहे.

‘शिस्तप्रिय’ अजित पवार यांची प्रतिमा उभारणाऱ्या नेत्यांनी आता या घटनेवर मौन बाळगले आहे. पण ग्रामस्थांचा सवाल मोठा आहे.”गावकऱ्यांनी जर परवानगीशिवाय मुरूम उपसा केला असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ठीक आहे. पण फोनवरून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या अजित पवारांवर कोण कारवाई करणार?”

टीकेचा भडिमार

या प्रकरणी सोशल मीडियावरून अजित पवारांवर चांगलाच टीकेचा भडिमार सुरू आहे. विरोधी पक्षनेते आणि कार्यकर्ते स्पष्ट शब्दांत म्हणतात हा प्रकार म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. कायदा सगळ्यांसाठी समान हवा, मग तो ग्रामस्थ असो किंवा उपमुख्यमंत्री….

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही