वर्षांनंतर हरवलेली पाखरे पुन्हा घरट्यात ; मोरणा विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
| यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयास आर्थिक सहाय्य दिले असून, भविष्यातही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली. एकूणच हा स्नेहमेळावा आठवणी, भावना आणि आपुलकी यांचा सुंदर संगम ठरला. |
जिल्हा प्रतिनिधी | संजय कांबळे
तब्बल २८ वर्षांनंतर शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. कोयना एज्युकेशन सोसायटीच्या मोरगिरी (ता. पाटण) येथील मोरणा विद्यालयात सन १९९६–९७ या इयत्ता दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. जणू हरवलेली पाखरे पुन्हा आपल्या घरट्यात परतली, असा भावनिक क्षण यावेळी अनुभवायला मिळाला.
रविवार, दिनांक २५ जानेवारी रोजी आयोजित या स्नेहमेळाव्यात अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी शाळेतील गमती-जमती, शिक्षकांची शिस्त व माया, बालपणीचे निरागस क्षण आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या आठवणींना उजाळा दिला. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले माजी विद्यार्थी एकत्र येऊन परस्पर संवाद साधत शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित माजी शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली. यावेळी दिवंगत माजी विद्यार्थी व शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एल. डी. कुराडे सर होते, तर प्राचार्य दिनकर माथणे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह पानस्कर सर, साळुंखे सर, डोंगरे सर, पाटील सर, भाकरे सर, चव्हाण सर, सुर्वे सर, पाटील मॅडम व तोरस्कर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून शालेय आठवणी, शिक्षकांचे ऋण आणि आयुष्यातील प्रवास उलगडून सांगितला. कुराडे सर, साळुंखे सर, डोंगरे सर, चव्हाण सर व पानस्कर सर यांनी आपल्या मनोगतात “आम्ही घडवलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे गौरवोद्गार काढून जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शंकर यादव यांनी स्वागत केले, संजय कांबळे यांनी प्रस्तावना मांडली, तर जोरामत शेख यांनी आभार मानले. दुपारी स्नेहभोजनानंतर ‘विद्यार्थी वर्ग’ भरविण्यात आला. आपल्या लाडक्या शिक्षकांची छडी प्रेमाने हातावर घेत विद्यार्थी वर्गातून बाहेर पडताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. त्यानंतर विद्यालयाच्या मैदानावर खेळ, गप्पा आणि ‘नाचरे मोरा’, ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यांवर सर्वांनी ठेका धरत उत्साह साजरा केला. या स्नेहमेळाव्यास पुणे, मुंबई तसेच परिसरातील व गावाकडील माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आवर्जून उपस्थिती लावली.