गुन्हे विश्व्महाराष्ट्रविदर्भ

१५०० च्या बोळक्यात, ‘ईमान’ गहाण ; एसीबीच्या छाप्यात दोघांचं कल्याण

वाशिम | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

वाशिमच्या पंचायत समिती कार्यालयात चक्क लाचखोरीचा बाजार मांडणाऱ्या दोन भ्रष्ट कर्मचारी आज एसीबीच्या सापळ्यात चवताळून अडकले. फक्त १५०० रुपयांच्या बोळक्यात जीव अडकवणारे हे अधिकारी आज चहूबाजूंनी नामोहरम झालेत. सरकारचा पगार खाताना चेहऱ्यावर प्रामाणिकपण्याची ढाल आणि मागे लाचेखोरीचं विषारी नख हाच खरा चेहरा पुन्हा उघडा पडला आहे.

२५ जुलै २०२५ रोजी सकाळी सिव्हिल लाईन येथील पंचायत समिती कार्यालयात एसीबीने आखलेला हा सापळा म्हणजे भ्रष्ट यंत्रणेला दिलेला एक सणसणीत चपराक होती. एसीबीच्या अमरावती विभागाने तडाखेबाज पद्धतीने कारवाई करत पालक तांत्रिक अधिकारी मयूर अंबरलाल हुमने (३४) व ग्राम रोजगार सहाय्यक ऋषिकेश उत्तम उगले (२७) या दोघा सरकारी दलालांना रंगेहाथ पकडून गुन्हेगारीच्या साखळीतून सरळ जेरबंद केलं.

ही थरारक कारवाई अचानक नव्हती. जांभरून परांडे (ता. वाशिम) येथील ३१ वर्षीय एका तरुणाने आपल्या वडिलांच्या विहिरीच्या नावाने मंजूर झालेल्या विहिरीच्या बांधकामाच्या प्रमाणपत्रासाठी ही मंडळी १५०० रुपयांची खुलेआम मागणी करत असल्याची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. २२ जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणीदरम्यान ही मागणी ठळकपणे समोर आली. मग काय, विभाग जागा झाला आणि आखून दिला. भ्रष्टाचार्यांच्या बुरख्याला फाडणारा सापळा….

सगळं ठरवल्यानुसार २५ जुलै रोजी हुमनेने लाचेची रक्कम थेट न घेता ती सहकाऱ्याला उगले याच्याकडे देण्यास सांगितली. उगलेने ती रक्कम स्वीकारताक्षणीच सगळ्या बाजूंनी एसीबीचं पथक त्यांच्यावर तुटून पडले. मोबाईल फोन ताब्यात, चौकशी सुरू, घरझडती सुरू, हॅश व्हॅल्यू तयार इतकंच नाही तर आता भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या धडक कारवाईत मोलाची भूमिका बजावली पोलीस निरीक्षक अलका गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील एसीबीच्या पथकाने त्यांना साथ दिली. सापळा सह अधिकारी पोउपअ जगदीश परदेशी, तसेच पो. हवा. राहुल व्यवहारे, विनोद अवगळे, योगेश खोटे, नाविद शेख आणि रवींद्र घरत यांनी केली.

आज वाशिममधील सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांच्या हातातल्या चहाचे कप थरथरताहेत… कार्यालयीन वर्दीत लपलेली लाचखोर मानसिकता आता सहन केली जाणार नाही, असा संदेश एसीबीने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही