२२ व्या वर्षी ‘मुंद्रुळकोळे’त शिवसेनेचा भगवा झेंडा ; भाजपच्या तगड्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारत मृणाल पाटील विजयी
बनपुरीची लेक जिल्हा परिषदेत ; जनतेने दाखवली विकासालाच मतांची पोचपावती

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
पाटण | राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या मुंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात यंदा निकालाने सगळ्यांचेच राजकीय गणित कोलमडले. भाजपने पूर्ण ताकद लावून, मोठमोठ्या दाव्यांचा गजर करत मैदानात उतरवलेल्या उमेदवाराला मतदारांनी सपाटून नाकारत शिवसेनेच्या अवघ्या २२ वर्षीय मृणाल महेश पाटील यांच्या हातात विजयाचा झेंडा दिला. या दणदणीत विजयाने भाजपच्या बालेकिल्ल्याच्या दाव्याला जोरदार धक्का बसला आहे.
११ मार्च २००३ रोजी जन्मलेल्या मृणाल पाटील या जिल्हा परिषदेत निवडून गेलेल्या सर्वांत कमी वयाच्या महिला उमेदवार ठरल्या आहेत. बनपुरी या श्री क्षेत्र नाईकबाच्या पवित्र भूमीत वाढलेल्या या लेकीने केवळ वयाच्या २२ व्या वर्षी राजकीय रणांगणात उतरून भाजपच्या तगड्या उमेदवार डॉ. प्राची नरेंद्र पाटील यांच्याविरोधात कडवी झुंज देत विजय संपादन केला. “अनुभव नाही” असा आरोप करणाऱ्यांना मतदारांनीच उत्तर दिले.
दहावीपर्यंतचे शिक्षण कराडच्या लाहोटी कन्या प्रशालेत, तर वाणिज्य शाखेची पदवी सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत संपादन केलेल्या मृणाल यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड झाली होती. यूएस-आधारित प्रोजेक्टवर काम करण्याचा अनुभव असलेली ही तरुणी कॉर्पोरेट करिअरची संधी बाजूला ठेवून थेट जनसेवेच्या मैदानात उतरली यातच तिची जिद्द आणि बांधिलकी दिसून येते.
या निवडणुकीत भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. मोठमोठ्या सभांमधून दावे-प्रतिदावे झाले. पण मतदारांनी भावनिक घोषणांपेक्षा प्रत्यक्ष विकासकामांकडेच पाहिले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची साक्ष जनतेसमोर होती. रस्ते, पाणी, शिक्षण, मूलभूत सुविधा यामध्ये झालेली कामगिरी हीच शिवसेनेची खरी जमेची बाजू ठरली. विकासाला मतदारांनी शिक्कामोर्तब केले आणि भाजपचा गाजावाजा हवेतच विरला.
मृणाल यांच्या पाठीशी त्यांचे वडील, सुप्रसिद्ध उद्योजक महेश पाटील यांचा सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील दीर्घकाळाचा लोकसंपर्क उभा राहिला. चुलते मनोज पाटील हे बनपुरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, तर आजोबा (कै.) रघुनाथ पाटील यांनी सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले होते. मोठा राजकीय वारसा नसतानाही समाजकारणाची परंपरा आणि जनतेचा विश्वास या भक्कम पायावर मृणाल उभ्या राहिल्या.
प्रचारादरम्यान त्यांनी केलेले भावनिक आवाहन “मी आता फक्त बनपुरीची लेक नाही, तर या संपूर्ण विभागाची लेक आहे, लेकीलाच काळजी असते” हे मतदारांच्या मनाला भिडले. मंत्री देसाई यांनीही गट-तट विसरून लेकीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्या सादेला प्रतिसाद देत मतदारांनी मतदानपेटीतून स्पष्ट संदेश दिला.
हा विजय केवळ एका उमेदवाराचा नाही तर अहंकारावर विकासाचा, दिखाव्यावर कामगिरीचा आणि तरुण नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचा आहे. जिल्हा परिषद सभागृहात लोकांचे प्रश्न तडफेने मांडण्याचा निर्धार व्यक्त करत मृणाल पाटील यांनी नव्या पिढीच्या राजकारणाची नांदी दिली आहे. मुंद्रुळकोळे गटातील मतदारांनी दाखवून दिले. तरुणाई पुढे आली तर बदल अटळ आहे, आणि भाजपच्या बालेकिल्ल्याची हवा कधीही निघू शकते.