घाटनांद्रे परिसरात घडलेल्या खुनाचा गुन्हा उघड ; दोन आरोपींना अटक तर एक फरार

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे परिसरात घडलेल्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक फरार आहे. या कारवाईमुळे परिसरात दिलासा तर पोलिसांप्रती विश्वास दुणावला आहे.
दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तिसंगी–घाटनांद्रे रोडवरील शेतात ३० वर्षीय सुनिल विलास शिंदे याचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तींनी दगडाने मारहाण करून त्याचा खून केला होता. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ठिकाणी कोणताही भौतिक किंवा तांत्रिक पुरावा न सापडल्याने तपासाचे आव्हान अधिकच वाढले.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी विशेष पथक तयार केले. पथकातील पोहेकॉ संदीप नलावडे, सागर लवटे, सोमनाथ गुंडे व अमर नरळे यांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपींचा माग काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारे मालगाव–मिरज रोडवर सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या दोघांनी आपली नावे अभिजित सर्जेराव जांभळे (१९, रा. गुंडेवाडी, ता. मिरज) व विनायक ऊर्फ बंडु बाळु मोहिते (३५, रा. मंगसुळी, ता. अथणी, जि. बेळगांव) अशी सांगितली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी चौकशीदरम्यान अखेर खुनाची कबुली दिली. त्यांचा आणखी एक साथीदार प्रभु परशुराम तळगडी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सदर चौकशीत उघड झाले की, मयत सुनिल शिंदे व आरोपी विनायक मोहिते हे पूर्वीपासून मित्र होते. मात्र, वैवाहिक कारणावरून सुनिल शिंदे सतत मोहितेला धमक्या देत होता. याच कारणावरून आरोपींनी डोक्यात दगड घालून सुनिलचा खून केल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक ३५२/२०२५, कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईस मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. अवघ्या एका दिवसात खुनाचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.