अग्रणी नदीला पूर ; पुलावरून पाणी ; सलगरे–हिंगणगाव मार्ग ठप्प

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | सांगली जिल्ह्यातील सलगरे–हिंगणगाव रस्ता अतिवृष्टीमुळे बंद झाला आहे. सलगरे व परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पूर आला असून नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
शुक्रवारी रात्रीपासून नदीच्या पातळीत अचानक वाढ झाली आणि पुलावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झाला. हा मार्ग मिरज तालुक्यातील सलगरे, अथणी तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील गावांना जोडणारा महत्त्वाचा संपर्कमार्ग आहे. विद्यार्थ्यांपासून शेतकरी, व्यापारी व कामगारांपर्यंत अनेकजण या मार्गावर अवलंबून असल्याने वाहतूक बंद झाल्यामुळे मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेण्यात अडथळा निर्माण झाला असून दुग्धव्यवसायिकांना दुध संकलनातही अडचणी येत आहेत. रुग्णांना दवाखान्यात वेळेत पोहोचण्यात विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावरील वाहतूक बंद केली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र तो लांबचा आणि वेळखाऊ असल्याने अडचणी वाढल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून नदीपात्रातील पाणी ओसरण्याचीच नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.