चारचाकी शिकणे जीवावर बेतले ; शिंदेवाडीत चारचाकी गाडी विहिरीत कोसळून तरुण यवकाचा दुर्दैवी मृत्यू

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज (आरग) | चार चाकी गाडी शिकत असताना ओमनी कार अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळल्याने एक तरुण युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिंदेवाडी (ता. मिरज) येथील गावात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. मृतदेह मंगळवारी मध्यरात्री विहिरीतून उशिरा बाहेर काढण्यात आला.स्वप्निल निवास कामिरे (वय २०, रा.शिंदेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कामिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी सायंकाळच्या सुमारास शिंदेवाडी ते लिंगनूर जुना रस्त्यावर स्वप्निल चार चाकी ओमनी गाडी शिकण्याचा प्रयत्न करत होता. कार गाडी शिकत असताना, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्यालगत असणाऱ्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत थेट कोसळली. यावेळी पाण्यात बुडून स्वप्निलचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार गाडी विहिरीत कोसळल्याची घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली.जवळपास ३० फूट पाणी या विहिरीत होते.तीन विद्युत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करण्यात येत होता. यावेळी ग्रामस्थांनी मोठीं गर्दी केली होती.
रात्री उशिरापर्यंत विहिरीतील पाणी बाहेर काढून क्रेनच्या साह्याने गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मृत स्वप्नीलचे आई-वडील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कुटुंबाचा आधार गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातामुळे शिंदेवाडीसह आरग परिसरात शोककळा पसरली. यावेळी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्स या आपातकालीन पथकाने रेस्क्यू केले. रेस्क्यू पथकाच्या कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, सदाशिव पेठकर, आकाश कोलप, असिफ मकानदार, कृष्णा हेगडे यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.