गुन्हे विश्व्महाराष्ट्र राज्य

माजी सैनिकाच्या खूनप्रकरणी एकाला उस्मानाबाद येथून अटक ; पैसे हडपण्यासाठी खून केल्याची कबुली

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | आदी माने

तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील डोर्ली फाटा येथील निवृत्त लष्करी सुभेदाराच्या खूनप्रकरणी एकाला उस्मानाबाद जिल्ह्यातील देवगाव येथून अटक करण्यात आली आहे. सुभेदारांकडे असलेली मारूती कार विकून त्याचे पैसे हडप करण्यासाठी हा खून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे. वैष्णव विठ्ठल पाटील (वय १९, रा. बलगवडे, ता. तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, गणपतराव शिंदे हे तासगाव-भिवघाट रस्त्यावरील नवी डोरली फाट्यावरील असणार्‍या त्यांच्या शेतातील घरात एकटेच राहत होते. गणपतराव यांची कार विकून पैसे हडप करण्याच्या हेतूने संशयित वैष्णव याने लोखंडी रॉड गणपतराव यांच्या डोक्यात व कपाळावर मारून त्यांचा खून केला होता. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर संशयित वैष्णव हा गणपतराव यांची कार घेऊन पसार झाला. गुरुवारी सकाळी लष्करातील निवृत्त सुभेदार गणपती धोंडीराम शिंदे (वय ६५) यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तासगाव पोलिसांसह एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. शिंदे यांच्या घराच्या परिसरात चौकशी केल्यानंतर संशयिताचे नाव निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पोलिस पथके पाठवण्यात आली होती. खबऱ्यांकडून मिळालेली माहिती तांत्रिक तपासाद्वारे संशयित पाटील उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे देवगाव येथे जाऊन वैष्णव पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने शिंदे यांची मारूती कार विकून त्याचे पैसे हडप करण्यासाठी शिंदे यांचा खून केल्याची कबुली दिली. तसेच जाताना शिंदे यांच्या खिशातील दीड हजार रूपयेही नेल्याची कबुली दिली. त्याला अटक करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, रूपाली बोबडे, अरूण पाटील, सतीश माने, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अभयसिंह सुर्यवंशी, सयाजी पाटील, प्रशांत चव्हाण आदींनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही