विश्रामबाग पोलिस, एलसीबीची संयुक्त कारवाई ; दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक ; ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
सांगली शहरात दिवसा घरफोडी करून ऐवज लंपास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४.५० लाख रूपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. विश्रामबाग पोलिस आणि एलसीबीच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
सॅमसन रूबीन डॅनियल (वय २५, रा. कल्याण पश्चिम, ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विश्रामबागमधील स्फूर्ती चौक परिसरातील दत्तात्रय पाटील यांचे बंद घर फोडून ऐवज लंपास करण्यात आला होता. दि. १३ आगस्ट रोजी ही घटना घडली होती. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्यांचा शोध विश्रामबाग पोलिसांसह एलसीबीचे पथकही घेत होते. ही चोरी सॅमसन डॅनियल याने केल्याची तसेच तो सुरत (गुजरात) येथे असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस हवालदार सागर लवटे यांना खबऱ्याद्वारे मिळाली.
त्यानंतर एलसीबीच्या पथकाने सूरत येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने चोरीचा मुद्देमाल वांगणी (ठाणे) येथे असल्याची कबुली दिली. त्यानंतर विश्रामबागच्या पथकाने वांगणी येथून चोरीचे ४.५० लाख रूपये किमतीचे दागिने जप्त केले.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने विश्रामबागचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहायक निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, सागर लवटे, बिरोबा नरळे, प्रशांत माळी, संदीप नलवडे, सोमनाथ गुंडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.