मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा !

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे.
मस्साजोगमधील (बीड) सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते.
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती. धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आरोप झाले होते. सुरुवातीला बीड पोलिसांनी याप्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचराई केली होती. अखेर याप्रकरणावरुन प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीआयडी आणि एसआयटीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला होता. यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. नुकतेच याप्रकरणात १५०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना तूर्त सहआरोपी केले जाणार नाही, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. चार्जशीटमध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाही. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही कुठलीही कार्यवाही नाही. राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष असणार आहे.
वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जात होता. धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर होती, असे सांगितले जाते. वाल्मिक कराड याने आवादा या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यावरुन कंपनी प्रशासन आणि वाल्मिक कराड यांच्यात वाद होते. या वादातून वाल्मिक कराडचे सहकारी आवादा कंपनीत गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. हा सुरक्षारक्षक मस्साजोग गावातील असल्याने सरपंच संतोष देशमुख आवादा कंपनीत गेले होते. त्याठिकाणी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी वाल्मिक कराडच्या टोळीच्या लोकांना मारहाण केली होती. ६ डिसेंबर २०२४ रोजी हा वाद झाला होता. त्यानंतर या भांडणाचा डुख मनात ठेवून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा ; धनंजय मुंडे
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय देशमुख एक्सवर पोस्ट करत म्हणाले.
धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून केले मुक्त
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे सूत्रांची माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणांचं गांभीर्य सांगितलं. सरकारच्या भविष्यात वाढणाऱ्या अडचणी देखील देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत सांगितल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासून आग्रही होते. मात्र, धनंजय मुंडे यासाठी तयार नसल्याची सूत्रांने माहिती दिली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार यांनी घ्यावा, असेही सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. अखेर काल अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती.