मराठवाडा

देवणीमध्ये अवैध स्टोन क्रशरवर गाजली महसूल विभागाची गदा, सील करत ठोठावला दंड…

लातूर | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
देवणी प्रतिनिधी | देवणी तालुक्यातील मौजे देवणी खुर्द येथील सोनकवडे खडी केंद्रातील अवैध स्टोन क्रशरवर अखेर महसूल विभागाने धडक कारवाई करत क्रशर बंद व सील करून दंडात्मक कार्यवाही केली आहे. ही कारवाई अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या तक्रार व त्यानंतर झालेल्या तीन दिवसांच्या आमरण उपोषणाच्या दणक्याने करण्यात आली आहे.

या प्रकरणात क्रशर चालकांनी महसूल विभागाकडे केवळ नाममात्र महसूल गौण खनिज रक्कम भरली होती. प्रत्यक्षात मात्र, शेकडोपटीने उत्खनन करण्यात आले होते. ETS मशीनच्या मोजणीद्वारे हे गैरप्रकार उघडकीस आल्यावरही स्थानिक पातळीवर याची दखल घेतली जात नव्हती.

या अनुषंगाने समितीने ७ एप्रिल २०२५ पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाची दखल घेत मंत्रालयातील मा.उपसचिव श्री.संजय धारूरकर यांच्या आदेशावरून कक्ष अधिकारी श्री.सदानंद मोहिते (महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई) यांनी मा.जिल्हाधिकारी लातूर यांना तपासाचे आदेश दिले.

यानंतर देवणीचे तहसीलदार श्री.सोमनाथ वाडकर यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली. चौकशीनंतर दोषी आढळलेल्या सोनकवडे खडी क्रशरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, मंडल अधिकारी देवणी यांनी तहसील कार्यालयात अहवाल सादर केला. यानुसार क्रशर बंद करून सील करण्यात आले आहे.

या संदर्भात जिल्हा खनिकर्म अधिकारी लातूर श्री.शिवमुर्ती बनसोडे यांनी पत्राद्वारे माहिती दिली असून, ही कारवाई संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या संघर्षाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. हा निर्णय एकदाच अवैध उत्खनन करणाऱ्यांना जबर धक्का ठरणार असून, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या संघर्षाचे हे मोठे यश ठरले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही