मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने फी वसूल केल्यास महाविद्यालयांवर फौजदारी गुन्हा ; सुलोचना सोनवणे

LiVE NEWS | UPDATE
सोलापूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून. कोणत्याही प्रकारची जबरदस्तीने फी वसूल केल्यास व याबाबत तशी तक्रार आल्यास शहनिशेमध्ये तसे सिध्द झाल्यास संबंधित महाविद्यालयावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा सोलापूरच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिला आहे.
दहावी व बारावी निकालांनंतर प्रवेशासाठी पालक व विद्यार्थ्यांची आर्टस, कॉमर्स, विज्ञान यासोबतच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. शासनाकडून विविध योजना, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना दिलासा मिळतो. मात्र, काही महाविद्यालयाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
दरम्यान, शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये; तसेच आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयास याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहाराद्वारे सूचित करण्यात आले आहे. तरीही काही महाविद्यालयांकडून वसूल होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती समाजकल्याण विभागाने दिली. तक्रारी प्राप्त होताच सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली, मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी जबरदस्तीने फी वसूल करू नये, केल्यास संबंधित महाविद्यालयावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.