एकही मराठी शाळा बंद होऊ देणार नाही – बच्चू कडू यांचा निर्धार

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पोरांसाठी चालणाऱ्या ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचा प्रस्ताव अत्यंत अन्यायकारक असून, “एकही मराठी शाळा बंद होऊ देणार नाही,” असा ठाम इशारा माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी दिला आहे.
प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करत, येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे आणि ग्रामविकास मंत्री यांच्या समवेत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळाने यावेळी बच्चू कडू यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात प्रामुख्याने राज्यातील 18,000 शाळा बंद करण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव हा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा आणणारा असून, तो तातडीने मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्यांची मुले शिकून पुढे यावीत, ही आमची भूमिका आहे. शिक्षण हे मूलभूत हक्कांपैकी एक असून, त्यावर कुणीही गदा आणू शकत नाही.” त्याचप्रमाणे, सांगली जिल्ह्यातील शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न, शिक्षकांना बिनकामाचे बी.एल.ओ. (BLO) काम लावणे, आणि शैक्षणिक व्यवस्थेतील हलगर्जीपणा यावरही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
प्रहार शिक्षक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आणि सांगली जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर यांनी सांगितले की, “शिक्षकांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले असून, त्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारकडून तातडीने पावले उचलली पाहिजेत.”
या प्रतिनिधी बैठकीत सरचिटणीस अमोल जाधव, शिराळा तालुका अध्यक्ष रमेश टिके, सरचिटणीस राजू जाधव, तसेच प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील, प्रहार पक्षाचे शिराळा तालुका अध्यक्ष बंटी नांगरे पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.
बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला गेला, तर त्याचा तीव्र विरोध करण्यात येईल आणि संघर्ष करण्यास मागे हटणार नाही.
या संपूर्ण बैठकीमधून शिक्षण व शिक्षकहिताचे प्रश्न सरकारपुढे ठामपणे मांडले जातील आणि त्यावर लवकर निर्णय घेण्यात यावा यासाठी बच्चू कडू स्वतः पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.