सायलेन्सर फुटतोय ; कायदा मात्र, गप्प बसतोय

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर | शहरात ‘सैराट’ स्टाईलने सुसाट धावणाऱ्या आणि बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या काही युवकांनी संपूर्ण शहराला हैराण करून सोडलं आहे. फटा-फटणाऱ्या आवाजामुळे वृद्ध, रुग्ण, विद्यार्थी आणि सामान्य नागरीक हैराण झाले असून या बुलेटस्वारांच्या दहशतीला आळा बसावा म्हणून पोलिसांनी तात्काळ आणि कठोर पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
शहरात काही बुलेटस्वारांनी त्यांच्या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर फेरफार करून ‘फटाक्यांसारखा’ आवाज निर्माण करणारे बदल केले आहेत. या आवाजामुळे रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांचीही झोप उडाली आहे. लहान मुलांचे घाबरणे, आजारी व्यक्तींना होणारा त्रास, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा अशा अनेक समस्यांनी शहर त्रस्त झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई करत बुलेटस्वारांच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. गुरुवारी झालेल्या तपासणी मोहिमेत काही बुलेटस्वारांच्या गाड्यांचे सायलेन्सर तपासण्यात आले आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई देखील झाली. मात्र, ही कारवाई पुरेशी नसून अजूनही शहरात सैराट स्टाईलने बिनधास्त फिरणारे ‘फटाके बुलेटस्वार’ मोकाटच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ खानापूर्तीसाठी तर नाही ना, असा प्रश्न आता नागरीक उपस्थित करत आहेत.
अनेक नागरिकांनी यापूर्वी तक्रारी करूनही पोलिसांनी फारशी गांभीर्याने घेतल्याचे दिसले नाही. त्यामुळे आता या ध्वनीप्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाईसह, त्यांच्या गाड्यांचे परवाने रद्द करणे, सायलेन्सर त्वरित जप्त करणे, आणि अशा वाहनचालकांना सुधारण्याचा इशारा देणे, याची अपेक्षा आहे. फक्त नियम सांगून थांबण्यापेक्षा आता पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे बनले आहे.
फटाके बुलेटमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत कायद्याने बंदी असून, अशा प्रकरणांवर मोटार वाहन कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. मात्र, यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. पोलिसांनी शहरात नियमित गस्त ठेवून, अशा बुलेटस्वारांना अटकाव घालावा आणि नागरिकांचे आरोग्य, शांतता आणि सार्वजनिक जीवनमान सुरळीत ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.
मंगरुळपीर शहरात पोलीस प्रशासनाने जर वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर या बुलेटस्वारांचा आवाज शहराच्या शांतीवर कुरघोडी करेल हे निश्चित आहे. त्यामुळे पोलिसदादा तुम्ही तरी जागे व्हा ? ही मागणी आता केवळ विनंती न राहता, जनतेचा रोष बनली आहे.