ठाणेदार किशोर शेळके यांच्या आवाहनाला प्रतिसाद ; धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे स्वयंस्फूर्तीने हटवले

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मंगरुळपीर (प्रतिनिधी) | धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात पोलिस प्रशासनाने उचललेले पाऊल यशस्वी ठरले आहे. ठाणेदार किशोर शेळके यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील अनेक धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे स्वयंप्रेरणेने हटविण्यात आले आहेत.
दि. २६ जुलै रोजी मंगरुळपीर पोलिस ठाण्यात पोलिस ठाणेदार किशोर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सर्व धार्मिक स्थळांचे विश्वस्त, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत कायद्याचे पालन करताना शांतता व सौहार्द राखण्याचा आग्रह पोलिसांनी धरला. नागरिकांनीही पोलीस प्रशासनाच्या सूचनांना प्रतिसाद देत सहकार्याचे पाऊल उचलले.

या बैठकीत ठाणेदार शेळके यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही धार्मिक स्थळी परवानगीशिवाय भोंगे लावणे हे कायद्याच्या विरोधात आहे. यापुढे अशा भोंग्यांचा वापर झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि भोंगे जप्त केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
नवीन नियमांनुसार, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा वापर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच करता येईल. यावेळी ध्वनी मर्यादा ५५ डेसिबलच्या आत असावी, तर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेत ४५ डेसिबल ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ठाणेदार किशोर शेळके यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शहरात प्रशासन आणि नागरिक यांच्यात सौहार्दपूर्ण समन्वय निर्माण झाला आहे. कायद्याचे पालन करत धार्मिक वातावरण शांततेत राखण्यासाठी शेळके यांचे कार्य निश्चितच स्तुत्य आहे, असे नागरिकांतून बोलले जात आहे.