जावेद अहमद सौदागर यांची काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती ; निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळाली मोठी संधी

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, मंगरुळपीर येथील काँग्रेसचे निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते जावेद अहमद सौदागर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास स्थानिक आणि जिल्ह्यातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.
या नव्या कार्यकारिणीत काँग्रेसने अनेक नवे आणि अनुभवी चेहऱ्यांना स्थान दिले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी रात्री उशिरा यादी प्रसिद्ध करण्यात आली.
या यादीत ३६ वरिष्ठ नेते राजकीय व्यवहार समितीत, १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, ५ वरिष्ठ प्रवक्ते, १०८ सरचिटणीस, ९५ चिटणीस, ८७ सदस्य कार्यकारी समितीमध्ये आहेत. या महत्त्वाच्या यादीत वाशिम जिल्ह्याला मोठे प्रतिनिधित्व मिळाले असून, जावेद अहमद सौदागर यांच्यावर सचिवपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
सौदागर हे काँग्रेस पक्षाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते असून, त्यांनी गेल्या अनेक वर्षांत पक्षाच्या विविध पदांवर काम करत राजकीय कार्याचा मोठा अनुभव घेतला आहे. संघटन कौशल्य, प्रगल्भ राजकीय दृष्टिकोन आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळे सौदागर यांना हा सन्मान मिळाला, असे पक्षांतर्गत सुत्रांकडून सांगण्यात आले.
पक्षाच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ते केवळ आपल्या भागापुरतेच मर्यादित न राहता जिल्हा आणि विभागीय स्तरावरही पक्षाला बळकटी देत आहेत. त्यांच्या संयमित आणि समन्वयात्मक नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना जावेद सौदागर म्हणाले, मी काँग्रेस पक्षाशी कायम निष्ठावान राहिलो असून, पक्षवाढीचे कार्य हेच माझे ध्येय आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला मी पूर्णपणे पात्र ठरीन. ही केवळ सन्मानाची नाही तर जबाबदारीची संधी आहे.