एरंडोली ग्रामपंचायतीत अतिक्रमण प्रकरणावरून राजीनाम्यांचे राजकारण ; १४ सदस्यांचे एकत्रित राजीनामे मंजूर, ग्रामपंचायत अल्पमतात

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज तालुक्यातील एरंडोली ग्रामपंचायतीत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून मोठा राजकीय भूकंप झाला असून, ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांपैकी तब्बल १४ सदस्यांनी दिलेले राजीनामे बुधवारी झालेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आले. यामुळे सध्या सरपंच वासंती धेंडे, उपसरपंच आणि एका सदस्यासह केवळ तीन सदस्य उरले असून, ग्रामपंचायत अल्पमतात गेली आहे. उर्वरित सदस्यांच्या राजीनाम्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपण्यास केवळ चार महिने शिल्लक असताना पाणवठ्यालगत कर्मचाऱ्याच्या वतीने घालण्यात आलेल्या खोक्याच्या अतिक्रमणावरून हे नाट्य घडले. संबंधित अतिक्रमणाबाबत कारवाई न झाल्याने नाराज झालेल्या सदस्यांनी एकत्रितपणे राजीनामे सादर केले. विशेष म्हणजे, हे सर्व राजीनामे सरपंच वासंती धेंडे यांच्याकडे टपालाद्वारे पाठविण्यात आले होते. उपसरपंच व एका सदस्याने मात्र राजीनाम्याच्या भूमिकेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेत सरपंच धेंडे यांच्यासोबत उभे राहिले.
बुधवारी आयोजित विशेष सभेत अतिक्रमणाबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, अतिक्रमण करणाऱ्या कर्मचाऱ्याने काही राजीनामा दिलेल्या सदस्यांच्याच संमतीने खोके टाकल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या आरोपांची चौकशी व्हावी, याआधीच सदस्यांनी आपली राजीनाम्याची भूमिका कायम ठेवत राजीनामे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी, या सर्व राजीनाम्यांना मंजुरी देण्यात आली.
सदर राजीनाम्यांची पुढील सात दिवसांत प्रशासकीय कार्यवाहीसाठी संबधित विभागाकडे पाठवणी होणार आहे. त्यामुळे या घटनेनंतर ग्रामपंचायतीचे भवितव्य काय राहणार, याबाबत ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
सरपंच धेंडे यांचा आरोप : विरोधकांचा डाव, ठोस कारणच नाही
या साऱ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सरपंच वासंती धेंडे यांनी आपली बाजू मांडली. त्या म्हणाल्या, “ग्रामपंचायत जवळच्या अतिक्रमणाबाबत आम्ही कोणतेही समर्थन केलेले नाही. मात्र, मी मागासवर्गीय महिला सरपंच असल्याने सुरुवातीपासूनच मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू होता. विरोधी गटातीलच काही सदस्यांनी या अतिक्रमणाला संमती दिली होती, आणि आता तेच या मुद्द्यावरून राजीनाम्याचे राजकारण करत आहेत.”
सदस्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रांमध्ये कोणतेही ठोस कारण नमूद केलेले नाही. तसेच राजीनाम्याआधी ना माझ्याशी चर्चा झाली, ना एखादी तक्रार पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा अन्य प्रशासनाकडे देण्यात आली, असेही धेंडे यांनी स्पष्ट केले.
गावात सध्या या संपूर्ण प्रकरणावरून चर्चांचे पेव फुटले आहे. ग्रामपंचायतीच्या अल्पमतात गेल्यानंतर आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हे संपूर्ण नाट्य आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप घडवणारी ठरण्याची चिन्हे आहेत.