वीजसेवा आता मोबाईलच्या हाती ; महावितरण देतंय वेळेवर माहिती
मेसेजवर वीजबिल, बंदीची खबर ; महावितरणचा ‘डिजिटल’ सफर

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
सध्या डिजिटल युग झपाट्याने पुढे सरकत असताना, महावितरणनेही ग्राहकांच्या सेवेत क्रांतिकारी बदल करत एक नवा उपक्रम सुरू केला आहे. आता वीज ग्राहकांना वीजबंद वेळा, देखभाल-दुरुस्तीची सूचना, तांत्रिक बिघाड आणि वीजबिलासारखी महत्त्वाची माहिती थेट एसएमएसद्वारे मिळणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
महावितरणच्या वाशी मंडळ विभागात याची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू झाली असून, अनेक ग्राहकांनी आपले मोबाइल क्रमांक नोंदणी करून घेतले आहेत. परिणामी वीजबिल, नियोजित वीजबंद वेळा, आणि देखभाल कामांची माहिती थेट त्यांच्या मोबाईलवर येऊ लागली आहे.
मेसेज येत नसेल तर काय कराल?
काही ग्राहकांनी महावितरणकडे आपला मोबाइल नंबर नोंदवलेला असतानाही, त्यांना मेसेज मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशावेळी खालील गोष्टी तपासाव्यात:
- मोबाईल नंबर नोंदणी व्यवस्थित झाली आहे का, हे पुन्हा एकदा खात्री करून घ्या.
- मोबाइलच्या ब्लॉक किंवा स्पॅम सेटिंग्ज तपासून, महावितरणचा नंबर ब्लॉकमध्ये तर नाही ना, हे पाहा.
- तरीही समस्या असल्यास, ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करा किंवा महावितरण अॅप व वेबसाइटवर तक्रार नोंदवा.
मोबाइल नंबर नोंदवण्याची प्रक्रिया…
ग्राहक महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर, मोबाईल अॅपवर जाऊन आपला मोबाईल नंबर सहज नोंदवू शकतात. तसेच जवळच्या महावितरण कार्यालयात भेट देऊन, किंवा एसएमएसद्वारेही नोंदणी करता येते.
आपल्या भाषेत, आपल्या सोयीने…
ग्राहकांच्या भाषिक सोयीचा विचार करून, महावितरणने वीजसेवांची माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच इतर ३ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक आता आपल्याला सोयीच्या भाषेत वीजबिल, तक्रारी, सेवा माहिती सहज मिळवू शकतात.
अॅप आणि हेल्पलाइनचा लाभ घ्या…
महावितरणचा अधिकृत अॅप ग्राहकांच्या सेवेत सतत सक्रिय असून त्यामध्ये वीजबिल भरणे, तक्रार नोंदवणे, वीजबंद वेळा तपासणे यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय, हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधून ग्राहक त्वरित मदत घेऊ शकतात. त्यामुळे कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज उरत नाही.
महावितरणचा हा उपक्रम म्हणजे ग्राहकांशी अधिक जवळचा संपर्क ठेवण्याचा एक यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. माहितीची त्वरितता, सोपी नोंदणी प्रक्रिया आणि भाषेचा अडथळा नाहीशी करणारी योजना यामुळे ग्राहकांची सेवा अधिक सुलभ झाली आहे.