आगीत पेटला कार्यकर्ता, पण प्रशासनाच्या मनात अजून राख

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | खटाव येथील ग्रामविकास अधिकारी संजय गायकवाड यांच्या भ्रष्ट कारभारावर ठळक ठपका असलेला चौकशी अहवाल महिन्याभरापासून जिल्हा परिषद सांगलीच्या फाईलमध्ये धूळ खात पडून आहे. कारवाईऐवजी चाललेली उडवाउडवी अखेर इतकी टोकाची ठरली की, शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा थरारक प्रयत्न केला आहे.

बनसोडे गेल्या महिन्याभरापासून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उंबऱ्यावर उभे आहेत. चौकशी अहवालानुसार ग्रामसेवक दोषी आहे. मग कारवाई का नाही? यावर कोणाचंच ठोस उत्तर नाही. याच निष्क्रियतेला वाचा फोडत आज बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. मात्र, “अजून बघतो”, “पाहतो काय करता येतं”, अशा उडवाउडवीच्या बोलण्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी अडकले. याच निराशेत त्यांनी थेट अंगावर पेट्रोल ओतलं. उपस्थितांनी प्रसंगावधान राखून त्यांना रोखले, अन्यथा जिल्हा परिषदेत आज प्राणांतिक आगीचा धुरळा उसळला असता.

या घटनेनंतर जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. “हीच का लोकशाही? “फाईलवर सहीसाठी माणसं पेटायची का?”, “दोषींना संरक्षण, इमानेइतबारे काम करणाऱ्याला शिक्षा ? अशा संतप्त घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शिवसेना जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ चंडाळे यांनी यावेळी ठणकावून सांगितले की, “चौकशी अहवालात दोषी ठरलेला ग्रामसेवक मोकाट फिरतो आणि प्रशासन हात झटकतंय. हे अद्यापही सहन केलं जाणार नाही. जर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली नाही, तर शिवसैनिक स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल. त्यांनी १५ ऑगस्टपूर्वी कारवाई झाली नाही, तर मंत्रालयात आत्मदहनाचा इशाराही दिला आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद यमगर, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब देशमुख, उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे, हनुमंत कांबळे यांच्यासह मोठा कार्यकर्ता वर्ग घटनास्थळी उपस्थित होता. सर्वांनी एकमुखाने प्रशासनाचा विरोध केला.