मटक्याचं थैमान बंद ; पोलिसांनी जुगारबाजांचा खेळ केला छंदमुक्त

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
गावोगावात सट्टेबाजांच्या गल्लीबोळात झेंडा फडकवणाऱ्या वरली मटक्याच्या अवैध अड्ड्यांवर अखेर वाशिम पोलिसांनी धाड टाकून दणक्यात कारवाई केली. *मिलन डे वरली मटका* या केंद्रावर छापा मारून पोलिसांनी दोन मोटारसायकली, तीन मोबाईल आणि रोख रक्कम मिळून एकूण १,६७,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे ठाणेदार रामकृष्ण भाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शरद राठोड व फिरोज बेनीवाले यांनी ही कारवाई केली. वरली मटक्याच्या धंद्याने स्थानिक तरुण पिढी जुगाराच्या विळख्यात अडकत असताना, पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने सट्टेबाजांमध्ये खळबळ माजवली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी मिळालेला ₹१२७० रोख, दोन दुचाकी (₹१.६० लाख), आणि ₹६ हजार किमतीचे मोबाईल फोन ताब्यात घेतले. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हे नोंदवले असून तपास सुरू आहे. अड्ड्यांमागे कोणाचा वरदहस्त होता, याचा शोधही सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
गावखेड्यांमध्ये जुगाराचे मोहजाल फोफावत असताना, पोलिसांची ही कारवाई म्हणजे समाजाला दिलेला सणसणीत संदेश आहे. मात्र, फक्त एक छापा पुरेसा नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. सट्ट्याच्या सावटाखाली बुडणाऱ्या कुटुंबांची आयुष्यं वाचवण्यासाठी पोलिसांनी सातत्याने अशाच कारवाया सुरू ठेवाव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.