शाळेत नाही संस्कारांची शिदोरी ; फक्त बिले, ब्रँड, आणि फंडांची चोरी

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
एकेकाळी ज्ञानदायिनी म्हणून ओळखली जाणारी शाळा ही संस्था आता थेट लुटारू दुकानं बनली आहेत. खाजगी शाळांनी शिक्षण देण्याऐवजी नफा कमावण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. ‘गुरुकुल’ संस्कृतीच्या नावाने सुरू झालेल्या या शिक्षणसंस्थांनी आता पालकांच्या खिशावर सरळ हल्ला चढवला आहे.
शाळेच्या आवारातच स्वतःची दुकानं सुरू करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा म्हणजे फक्त कमाईचं साधन बनवलं गेलं आहे. या दुकानांमध्ये वही, पुस्तकं, पेन, पेन्सिल, दप्तर, गणवेश, बूट अशी शालेय साहित्यं ठेवून ती बाजारभावाच्या दुप्पट किंमतीने विकली जात आहेत. हे साहित्य इतरत्र स्वस्तात मिळत असूनही, पालकांना बळजबरीने हेच साहित्य खरेदी करण्यास भाग पाडलं जातं.
याचबरोबर ‘डेव्हलपमेंट फंड’, ‘अॅक्टिव्हिटी फंड’, ‘बिल्डिंग फंड’, ‘मल्टीपर्पज फंड’ यांसारख्या गोंडस नावांच्या फंडांखाली सरळ लूट सुरू आहे. हे पैसे कुठे वापरले जातात, याचा पत्ता नाही. कोणताही पारदर्शक हिशोब नाही. शाळा म्हणजे शिक्षण मंदिर न राहता चक्क एटीएम मशीन बनली आहे, अशी पालकांची तक्रार आहे.
या शिक्षण संस्थांनी एक पाऊल पुढे जात आता विद्यार्थ्यांसाठी बूट आणि गणवेशाचेही ठरावीक ब्रँड अनिवार्य केले आहेत. “या कंपनीचेच बूट घाला नाहीतर प्रवेश नाही, असा छुपा इशारा दिला जातो. 300 रुपयांचे बूट 1200 ला विकण्याचा हा प्रकार म्हणजे सरळ फसवणूक नाही का?
या मनमानी शाळांच्या कारभारावर सरकार डोळेझाक करतंय. या शाळांचे ऑडिट होते का? शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शाळांना दुकाने चालवण्याचा परवाना कोणी दिला? विद्यार्थ्यांच्या पालकांना साहित्य घेण्यासाठी फोर्स करणं कायद्याने बेकायदेशीर आहे. शिक्षण हे हक्काचं माध्यम आहे, पण आता ते श्रीमंतांचं साधन बनवलं जातंय. गरीब व मध्यमवर्गीय पालक अक्षरशः हैराण झाले आहेत.
सरकारने यावर तात्काळ कारवाई न केल्यास पालक संघटनांकडून मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला जातोय. शाळांच्या या लुटीला लगाम लावण्यासाठी कडक पावलं उचलली नाहीत, तर येणाऱ्या काळात जनआक्रोश उसळल्याशिवाय राहणार नाही.