घंटागाडीवाल्यांचा संताप अनावर ; अर्धनग्न रणांगणातून नगरपरिषदेवर हल्लाबोल

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
नगर परिषदेच्या गलिच्छ कंत्राटी कारभाराचा बळी ठरलेल्या घंटागाडी व ट्रॅक्टर सफाई कामगारांनी, अन्यायाच्या पायाभरणीला तडे देण्यासाठी सोमवार दि. ११ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अर्धनग्न साखळी उपोषण पेटवले आहे. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी घाम गाळणाऱ्यांना, आता स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी घाम गाळत रस्त्यावर बसावे लागते, याहून मोठा अपमान कोणता? असा संतप्त सवाल कामगारांनी उपस्थित केला.
गत २५ जुलै रोजी नवीन टेंडर काढून नगर परिषद प्रशासनाने जुन्या कंत्राटी सफाई कामगारांना हटवून, नव्या चेहऱ्यांना रुजू करून घेतले. दशकभरापासून ९० सफाई व कचरा संकलन कामगारांनी, घंटागाड्या व टँकरद्वारे शहराची स्वच्छता जपली होती. कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून कचरा उचलला, मृतदेह हलवले, गटारे साफ केली, पण बदल्यात बेरोजगारीची भेट मिळाली आहे.
कामगारांनी जुन्याच वेतनावर काम करण्याची तयारी दर्शवली होती, तरीही नगर परिषद प्रशासनाने त्यांना डावलले. किमान वेतनाची मागणी केली तर ती नाकारली, आम्ही जुन्या वेतनावरही तयार, तरीही आम्हाला फेकून दिलं. हे म्हणजे श्रमिकांवर थेट अन्याय झाला असा घणाघात अर्जुन नेमाडे, अमर चौधरी, संतोष काळे, राहुल ठोके, रवि पठाडे आदी कामगारांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी प्रशासनावर कंत्राटदारपक्षपातीपणा केल्याचा आरोप केला आहे. कामगारांची निष्ठा, अनुभव, त्याग यांची किंमत कंत्राटी आकड्यांसमोर फक्त शून्य आहे. टेंडर कागदावर सही झाली आणि आमचं आयुष्य रद्द झालं, असा जळजळीत आरोप त्यांनी केला.
आंदोलकांचा संताप उफाळण्यामागचं कारण स्पष्ट आहे. घर चालवायला पैसा नाही, शाळेतल्या मुलांच्या फी थकल्या, घरच्यांच्या औषधांसाठी पैसाही नाही आणि दरम्यान, नगर परिषदेच्या टेंडर खेळात कामगारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह पणाला लागला आहे.
आम्हीच शहराचे खरे स्वच्छता सैनिक आहोत आणि आम्हाला डावलणाऱ्यांनी जरा गल्लीबोळात उतरून पाहावं, स्वच्छतेसाठी कोण घाणीत उतरलं होतं. कचरा उचलताना आम्हाला कधी आजाराची, कधी मृत्यूची भीती वाटली नाही. पण आता उपाशी पोटाची भीती अधिक वाटते, असा जाहीरनामा त्यांनी फेकला आहे.
या आंदोलनात अर्जुन नेमाडे, अमर चौधरी, संतोष काळे, राहुल ठोके, रवि पठाडे, मनोज घाटे, गणेश इंगोले, योगेश आपटे, गणेश मोरे, अल्ताब चौधरी, सुधीर बोरकर, माधव कुचेकर, जयदीप ढोके, कृष्णा नेमाडे, शे. सलीम गुलाब, विला ढेले, राजु खंदारे, रामा भोंगळ, आकाश इंगोले, योगेश देवरे, संजय चव्हाण, अमोल समुद्रे, केदारनाथ रणखांब, भिमा गिर्हे, दिपक खंदारे, विजय गवळी, लखन गवळी, रामेश्वर सुतारे आदींचा सहभाग आहे.