भ्रष्टाचाराच्या गाड्या फुल स्पीडवर ; प्रशासनाच्या ब्रेकला गंज

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरूळपीर तालुका पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात आणि नियमबाह्य धान्य वाहतुकीविरोधात सामाजिक कार्यकर्ते विकास दाभाडे यांनी थेट अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तालुका कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आंदोलनाने तालुक्यात खळबळ उडवली असून, स्थानिक नागरिक, तरुण आणि समर्थक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.
दाभाडे यांनी पुरवठा विभागातील गैरव्यवहाराचे थेट उघड नाव घेत, द्वारपोच योजनेतील घोटाळे उघडे पाडले. नियमानुसार फक्त नोंदणीकृत आणि संपूर्ण हिरव्या रंगाचे (ग्रीन पेंट) वाहनच धान्य वाहतुकीसाठी वापरणे बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात नियम धाब्यावर बसवून इतर अनधिकृत वाहनांद्वारे मालाची वाहतूक सुरू आहे. यातील अनेक वाहनांनी वार्षिक करही भरलेला नाही, तरीदेखील त्यांना शासकीय पुरवठा कामात रेटून वापरले जात आहे. प्रशासन मात्र याकडे ‘अंधळं’ बनून पाहत नाही, तर पाहूनही कानाडोळा करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
सरकारच्या तिजोरीतून धान्य, नियम मोडून अनधिकृत गाड्यांमधून खेचले जात आहे. हे फक्त बेपर्वाई नाही, तर थेट भ्रष्टाचाराचं जाळं आहे. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकले पाहिजे, अशी ठाम मागणी दाभाडेंनी केली. त्यांनी इशारा दिला की, २० ऑगस्टपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही, तर ते पाण्याचाही त्याग करतील.
आंदोलनस्थळी वातावरण तापलेले असून, भ्रष्टाचाराच्या गाड्यांना ब्रेक लावा. भोंगळ कारभार बंद झाला पाहिजे. नियम मोडणाऱ्यांना जेलमध्ये टाका अशा समर्थकांच्या घोषणांनी तालुका कार्यालय परिसर दणाणून गेला आहे.
नागरिकांच्या मते, हा प्रकार फक्त पुरवठा विभागापुरता मर्यादित नसून, संपूर्ण यंत्रणेतील सडलेल्या साखळीचे लक्षण आहे. जेथे गरिबांसाठी असलेले धान्य नेमक्या प्रक्रियेनुसार पोहोचायला हवे, तेथे नियम मोडून ठेकेदारांचे पोट भरण्याचा उद्योग सुरू आहे. अशा स्थितीत, आंदोलनच हाच एकमेव मार्ग राहतो, असे अनेकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून मात्र नेहमीसारखी तपास सुरू आहे ही जुनीच टेप वाजवण्यात आली आहे. ठोस कारवाई ऐवजी कागदी तपास आणि ‘मीटिंग-मीटिंग’चा खेळ सुरूच आहे. आंदोलनकर्ते मात्र, या वेळेस माघार घेण्याच्या मूडमध्ये नाहीत.
दाभाडे यांचे अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. वैद्यकीय तपासण्या व डॉक्टरांचे सल्ले असूनही, त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. आम्ही थांबणार नाही, जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या गाड्यांना ब्रेक लागत नाही आणि पारदर्शक पुरवठा व्यवस्था उभी राहत नाही,” असे त्यांचे स्पष्ट शब्दांत सांगणे आहे.
आता प्रश्न असा आहे की, प्रशासन खरोखर डोळे उघडणार का? की हा लढा पाण्याच्या त्यागापर्यंत पोहोचणार? तालुक्यात याच चर्चेने तापमान वाढवले आहे.