आभाळ फाटलं ; ठाणे, रायगड, सांगलीसह राज्य पावसाने गिळलं…
मुसळधार पावसामुळे राज्यभरात शाळा व महाविद्यालय बंद, जीवन विस्कळीत

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबईपासून रायगड, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, पालघरपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळतोय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील अनेक भागांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे-पालघर सलग दुसऱ्या दिवशी शाळा बंद
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सलग दुसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रायगड-नवी मुंबई रेड अलर्टची धास्ती
रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगर पालिका हद्दीत तसेच नवी मुंबई महानगरपालिकेत उद्या सर्व शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्र बंद राहणार आहेत. रायगडमध्ये रेड अलर्टमुळे प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यांत दोन दिवस सुट्टी
पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड आणि सातारा तालुक्यांत दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोणावळा नगर परिषदेचा तडकाफडकी निर्णय
लोणावळ्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगर परिषदेने सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
सांगली पूरस्थितीच्या सावटाखाली, शाळा बंद
सांगलीत कृष्णा व वारणा नद्यांची पाणीपातळी वाढू लागल्याने मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांसह महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संभाव्य पूरस्थितीसाठी शाळांची इमारत नागरिकांच्या राहण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
सिंधुदुर्ग ऑरेंज अलर्टवर शाळा बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि खासगी शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
राज्यात पावसाचा अलर्ट : कुठे रेड, कुठे ऑरेंज, कुठे यलो
दरम्यान, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा याठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
हवामान खात्याने इशारा दिल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे, नद्या-ओढ्यांच्या पात्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.