बस थांब्यावर बॅनरचा ताबा ; प्रवासी बसची वाट बघतात की बॅनरची?

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | मार्केट परिसरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा एसटी थांबा केंद्र आज प्रवाशांच्या सोयीपेक्षा बॅनरबाजांच्या सोयीसाठी वापरलं जात असल्याचं वास्तव उघड झालं आहे. आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यालयासमोर उभारलेलं हे थांबा केंद्र प्रवाशांना दिलासा देणारं ठरावं अशी अपेक्षा होती. परंतु आज परिस्थिती उलट आहे.
बस थांबा केंद्र प्रवाशांसाठी उभारलं असताना प्रत्यक्षात ते बॅनरबाजीचं दालन बनलं आहे. एका युवा नेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने लावलेला बॅनर संपूर्ण थांब्यावर पसरलेला असून, त्यामुळे बस थांब्याचा मूळ चेहराच झाकला गेला आहे. प्रवासी थांबा शोधताहेत की बॅनरची शोभा पाहताहेत असा सवाल उपस्थित होत आहे.
अगोदरच या थांब्याचा वापर कपडे वाळवण्यासाठी काही भटक्या नागरिकांकडून केला जात होता. मद्यधुंद अवस्थेत पडून राहणाऱ्यांचाही हा ठिकाण बनला होता. त्यात आता बॅनरबाजीच्या अतिक्रमणाने कहर केला आहे. परिणामी नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेलं केंद्रच आता प्रवाशांच्या गैरसोयीचं कारण ठरत आहे.
सगळ्यात गंभीर बाब म्हणजे राज्य परिवहन महामंडळाचं उघडं दुर्लक्ष. बस थांब्यावर होणाऱ्या या उघड अतिक्रमणाकडे मंडळाने डोळेझाक केली आहे. तर दुसरीकडे महापालिका अतिक्रमण विभागही गप्प आहे. रस्त्यावरील इतर बॅनर, पोस्टर्स झटपट उतरवले जातात मात्र, राजकीय बॅनर असल्याने हा बॅनर मात्र अजूनही झळकत आहे.
नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, बस थांबा केंद्र खरंच प्रवाशांसाठी आहे की राजकीय जाहिरातींसाठी? आता राज्य परिवहन महामंडळ व महापालिका या अतिक्रमणावर कारवाई करतात की पुन्हा डोळेझाक करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.