पुरपिडीत शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या ; बिगर सातबारा संघटनेची प्रशासनाला मागणी

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर | वाशिम जिल्ह्यासह मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाने पुन्हा एकदा मोठा घाला घातला आहे. १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद यांसारखी महत्त्वाची पिके पाण्याखाली जाऊन अक्षरशः नष्ट झाली असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अनेक गावांमध्ये सुपीक माती वाहून गेल्याने शेतजमिनी खरडून गेल्या असून पुढील पेरणी करण्यालाही जमीन शिल्लक राहिली नाही. या संकटामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
यंदा बहुसंख्य शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र अतिवृष्टीने सर्वस्व उद्ध्वस्त झाले. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बिगर सातबारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिशकुमार इंगळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
२५ ऑगस्ट रोजी मंगरुळपीर तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले की, मंगरुळपीर तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्याला “ओला दुष्काळग्रस्त” घोषित करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांना कर्जमाफी व व्याजमाफीबाबत त्वरित निर्णय घ्यावा. खरडून गेलेल्या शेतजमिनी पुन्हा पेरणीयोग्य करण्यासाठी विशेष अनुदान द्यावे.
संघटनेने प्रशासनाला ठणकावून सांगितले की, फक्त लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करून निघून गेले, तर शेतकऱ्यांचे जळते अश्रू पुसले जाणार नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे. अन्यथा या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने संघटना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजु इंगोले, शामादादा कोलाम ब्रिगेडचे सुरेश कुंभरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे दुखणे ऐकून घेण्यासाठी आणि सरकारच्या कानावर आवाज पोहोचवण्यासाठी संघटना कटीबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आज शेतकरी आभाळाकडे पाहत आहे. एकीकडे पाऊस झोडपतो आहे आणि दुसरीकडे शासनाच्या उदासीन कारभाराने शेतकऱ्यांच्या जिवावर बेतणारी वेळ आली आहे. सरकारने तातडीने पाऊल उचलले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जना भाई इंगळे यांनी केली.