गणपती सणात वाहतुकीचा बट्ट्याबोळ : वाहतूक शाखा झोपेत, अधिकारी सुस्त

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | गणपती बाप्पाच्या आगमनाने मिरज शहरात उत्साहाचे वातावरण असताना वाहतूक नियंत्रण शाखेचा मात्र बट्ट्याबोळ झालेला दिसून येतोय. शहरातील मुख्य रस्त्यावरच अनधिकृत गाड्या डोईजडपणे उभ्या, गणपती घेऊन जाणाऱ्यांना प्रचंड अडथळा आणि तरीसुद्धा वाहतूक शाखेचे अधिकारी झोपेचे सोंग घेत सुस्तावलेले हे चित्र मिरजकरांच्या संतापाचा विषय ठरत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून गणपतींचे आगमन मोठ्या थाटामाटात सुरू असताना, शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावर, तेही वाहतूक शाखेच्या डोळ्यादोरसमोरच, चारचाकी गाड्या रांगेत उभ्या राहत आहेत. परिणामी रस्ते संकुचित होऊन नागरिक व मंडळांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा सगळा प्रकार थेट वाहतूक नियंत्रण शाखेच्या समोरच घडत असतानाही एकाही अधिकाऱ्याने लक्ष न देणे, हीच खरी खदखद नागरिकांच्या मनात उफाळून येते आहे.
गोरगरीब रिक्षाचालक, हातगाडीवाले, छोटे व्यापारी यांच्या बाबतीत मात्र, पोलिसगिरी झळकते. ‘वाहतुकीस अडथळा’ म्हणून दडपशाही करून कारवाई केली जाते. पण पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा आणि त्यालगत असणाऱ्या मोठ्या बेकरी, ज्वेलर्स, हॉटेल्स समोर होणाऱ्या अस्थव्यस्त पार्किंगकडे मात्र पोलिसांचे डोळे मिटतात. धनदांडग्यांना सोडून गरीबांवरच गंडा, हा दुहेरी न्याय नागरिकांना आता उघड दिसू लागला आहे.
पोलीस स्टेशनच्या शेजारीच आमदारांचे कार्यालय आहे. हाच भाग म्हणजे चारचाकींचे अनधिकृत पार्किंगचे अड्डे झालेले आहेत. या गाड्यांवर कधी कारवाई होत नाही यामागे राजकीय छत्रछाया आहे का? असा थेट सवाल आता मिरजकर करत आहेत.
गणपती उत्सव हा शहराच्या अभिमानाचा सण. पण त्याच सणात रस्त्यावरील गर्दी, अडथळे, अडकलेले गणपती मंडळांचे ट्रक आणि गोंधळलेले भाविक हे चित्र निर्माण झाले तर त्याला जबाबदार कोण? विसर्जनावेळी लाखोंचा जनसागर मिरजच्या रस्त्यावर उतरणार आहे. त्यावेळी या वाहतूक सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांची कसली तयारी आहे? असा प्रश्न आक्रमकपणे पुढे येतो आहे.
मिरज वाहतूक शाखेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या मनात चीड उसळली आहे. “गोरगरीबांसाठी कायदे आणि धनदांडग्यांसाठी वेगळे कायदे” या पोलिसांच्या वागणुकीवर आता संतापाची लाट उसळली असून, थेट पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी होत आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनावेळीच जर अशी दुर्दशा असेल, तर विसर्जनावेळी काय होणार? वाहतूक विभागाने झोपेतून बाहेर येऊन तात्काळ कारवाईचा बडगा उचलला नाही, तर नागरिकांचा संताप रस्त्यावर उसळल्याशिवाय राहणार नाही.