आरोग्यमहाराष्ट्रसामाजिक

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सांगली शिक्षक संघटनेचा ठाम पाठिंबा

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | श्रीकांत यमगर

सांगली जिल्हा परिषदेच्या आवारात गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेले आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण आता अधिकच तीव्र झाले आहे. दहा वर्ष सेवा झाली, आता कायम करा, या मुख्य मागणीसह आरोग्य सैनिकांचा लढा सुरू असताना जिल्ह्यातील शिक्षक संघटना समन्वय समितीने शुक्रवारी ठाम पाठींबा जाहीर केला.

या प्रसंगी समितीचे अध्यक्ष महेश शरणाथे म्हणाले, शिक्षक संघटना सदैव शोषितांच्या पाठीशी राहिली आहे. आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात आपलं आयुष्य धोक्यात घालून राज्य वाचवलं. आज त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. तुमच्या न्यायाच्या लढ्यात आम्ही सोबत आहोत.

सरचिटणीस सदाशिव वारे यांनीही शासनाला धारेवर धरत, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांची बाजू आम्ही शासन दरबारी ठामपणे मांडणार आहोत. सरकारने आता ढिम्म न राहता निर्णय घ्यावा, असा इशारा दिला.

प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर यांनी तर थेट सरकारला सणसणीत सुनावलं. ते म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. कोरोनाच्या महाभयंकर काळात हेच कर्मचारी जीव धोक्यात घालून जनतेच्या सेवेला धावून गेले होते. त्यावेळी राज्यभर टाळ्या-थाळ्या वाजल्या. आज मात्र त्याच कर्मचाऱ्यांना हक्काची नोकरी आणि स्थैर्य नाकारलं जातंय. हा कुठला न्याय?

सभेला शिक्षक संघटना आणि आरोग्य संघटना या दोन्हींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये समितीचे अध्यक्ष महेश शरणाथे, सरचिटणीस सदाशिव वारे, सहसरचिटणीस शशिकांत पाटील, प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर, सदस्य राजेश कांबळे, तसेच आरोग्य संघटनेचे विनायक पाटील, ज्योती कांबळे, राजेश कुंभार, दीप्ती धुमाळ, विष्णू माने, वंदना भोसले यांचा समावेश होता.

यावेळी उपोषणकर्त्यांना भक्कम आधार देताना तुमचा लढा आता केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांचा राहिला नाही, तर तो कामगार वर्गाचा, जनतेच्या हक्कांचा लढा झाला आहे. असे ठाम शब्दात मत व्यक्त करण्यात आले.

उपोषणकर्त्यांच्या डोळ्यांत आशेची चमक दिसत होती. गेल्या दोन आठवड्यांपासून शासन दरबारी याचना सुरू असली तरी अद्याप ठोस निर्णय झाला नाही. मात्र शिक्षक संघटनेच्या पाठींब्यामुळे आंदोलनाला नवा वेग आला आहे.यावेळी आभार प्रदर्शन शशिकांत पाटील यांनी केले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही