आरोग्यविदर्भसामाजिक

जिल्ह्यातील आश्रमशाळा व मदरसांनी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत घ्यावा सक्रिय सहभाग ; जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे आवाहन

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

डिसेंबर २०२६ पर्यंत गोवर व रुबेला निर्मूलन हे आपले सामूहिक उद्दिष्ट असून, यासाठी लसीकरणाचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा आणि मदरसांनी सक्रीय सहभाग नोंदवणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

१५ ते ३० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात विशेष गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृतीदलाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विभाग, समाजकल्याण विभाग यांच्यासह स्थानिक बालरोग तज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील ५ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना या मोहिमेत विशेष लसीकरण केले जाणार आहे. काही जिल्ह्यांतील आश्रमशाळांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याने आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत पात्र सर्व विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लसीचा एक अतिरिक्त डोस दिला जाणार आहे.

लसीकरण मोहिमेची प्रमुख उद्दिष्ट्ये म्हणजे डिसेंबर २०२६ पर्यंत गोवर व रुबेला निर्मूलन, लसीकरणाचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक करणे, दोन्ही डोस घेतलेल्या मुलांमध्ये ड्रॉपआऊट दर शून्य करणे हे आहे.

लसीकरणानंतर मुलांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागानेही सज्जता दाखवली आहे. सर्व शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांना संभाव्य प्रतिकूल घटनांचे व्यवस्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुलांनी लसीकरणानंतर किमान ३० मिनिटे केंद्रावर थांबणे आणि पुढील २४ तास त्यांच्यावर लक्ष ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय प्रत्येक लसीकरण सत्रासाठी सहा सदस्यीय पथक कार्यरत राहील. लसीकरणाची माहिती दररोज तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सादर करावी लागेल. मोहिमेत पालकांची संमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि जनजागृती उपक्रम या तिन्ही बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे.

जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, ही मोहीम केवळ आरोग्य विभागापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. आश्रमशाळा आणि मदरसे यांनी पुढाकार घेतल्याशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही. मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने या मोहिमेत योगदान द्यावे.

आरोग्य विभागाच्या पुढाकारासह विविध शासकीय विभागांचा परस्पर समन्वय आणि समाजाची सक्रीय साथ मिळाल्यास गोवर-रुबेला निर्मूलनाचे ध्येय नक्की साध्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही