कोंबड्यांना सेफ्टी, कामगारांना धोका ; बेजबाबदार कंपनीवर कारवाई न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा…
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | कामगारांना जिवंत कोंबड्यांपेक्षा हीन समजणाऱ्या, त्यांच्याशी थेट जीवाशी खेळणाऱ्या बाळकृष्ण बिडिंग फार्म, नंदा ग्रुप, बेडग या कंपनीवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) तर्फे करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष महादेव होवाळ यांनी या संदर्भात सहा. कामगार आयुक्त, सांगली यांच्याकडे निवेदन दिले असून, चार दिवसांत कारवाई न झाल्यास २३ सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
सविस्तर घटना अशी की, दिनांक १५ व १६ सप्टेंबर रोजी महादेव होवाळ हे बेडगवरून मंगसुळीकडे प्रवास करत होते. त्यावेळी बेडग हद्दीत नंदा ग्रुपचा ट्रॅक्टर बॉयलर कोंबड्या घेऊन जाताना दिसला. कोंबड्या लोखंडी जाळीत व्यवस्थित बांधलेल्या होत्या, परंतु, त्याच जाळीवर २५ ते ३० कामगारांना बसवून प्रवास घडविला जात होता. या कामगारांच्या सुरक्षिततेची कुठलीच सोय नव्हती. कुठलीही सेफ्टी बेल्ट, आधार किंवा खबरदारी न घेता हे सर्व कामगार वाहनावर बसलेले दिसले. परिणामी, कोंबड्या मात्र सुरक्षित आणि कामगार मात्र जीव मुठीत धरून असुरक्षित अवस्थेत प्रवास करत होते.
हा प्रकार केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर सरळसरळ कामगारांच्या जीवाशी खेळ असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. कोंबड्यांच्या सुरक्षेसाठी जाळ्या, पिंजरे, हा उपाय पण कामगारांसाठी काहीच नाही ही विडंबनात्मक आणि संतापजनक वस्तुस्थिती पाहून नंदा ग्रुपचा बेफिकीरपणा उघडकीस आला आहे.
या घटनेचे पुरावे, छायाचित्रे आणि साक्षीदार रिपब्लिकन पार्टीकडे असल्याचे महादेव होवाळ यांनी स्पष्ट केले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या कंपनीकडून नियमांची उघडपणे पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार आयुक्तांनी चौकशी करून कंपनीवर कठोर कारवाई करत परवाना रद्द करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सांगली आणि मानवी हक्क आयोग, दिल्ली यांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या विषयाची दखल उच्च पातळीवर घेतली जाणार आहे.
“जर चार दिवसांत कारवाई झाली नाही, तर २३ सप्टेंबर रोजी सांगलीत कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन उभारले जाईल. कामगारांचा जीव धोक्यात घालणाऱ्या, त्यांना प्राण्यांपेक्षा कमी लेखणाऱ्या कंपनीला मोकळं सोडणार नाही. अन्याय सहन केला जाणार नाही. असा स्पष्ट इशारा महादेव होवाळ यांनी दिला आहे