अडाण नदीत दिसलेल्या मृतदेहाचा शोध तिसऱ्या दिवशीही सुरूच

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यातील शिवणीजवळ अडाण नदीच्या प्रवाहातून वाहत गेलेल्या अनोळखी पुरुष जातीच्या मृतदेहाचा शोध तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. १६ सप्टेंबर रोजी सकाळी शिवणी पुलाजवळ मृतदेह वाहून जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती तहसीलदार रवींद्र राठोड व मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे पिएसआय ज्ञानेश्वर धावळे यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाला दिली. तत्काळ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू करण्यात आली.

प्रमुख जीवन-रक्षक दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखालील पथकात अतुल उमाळे, शेखर केवट, अंकुश सदाफळे, विष्णु केवट, शुभम भोपळे, निलेश खंडारे, विकास सदांशिव आदींचा समावेश होता. बोटीसह आवश्यक साहित्य वापरून पथकाने पहिल्याच दिवशी शिवणीपासून खडीधामणीपर्यंत सर्च ऑपरेशन केले; मात्र मृतदेह सापडला नाही.
१७ सप्टेंबर रोजी सकाळी अडाण धरणापासून उलटे शिवणीपर्यंत दिवसभर शोधमोहीम राबवली, तरीही मृतदेहाचा मागमूस लागला नाही. आज तिसऱ्या दिवशी म्हणजेच १८ सप्टेंबरलाही शोधमोहीम अखंड सुरू आहे. नदीला मोठा पुर, पाण्याचा जोरदार प्रवाह, धारांचे भोवरे, बंधारे आणि नदीपात्रातील घनदाट झाडी-झुडपे यामुळे मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत. मृतदेह एखाद्या झुडपात अडकला असण्याची शक्यता मानून पथक प्रयत्नशील आहे.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शहू भगत यांनी सर्च ऑपरेशनचा आढावा घेतला. पोलीस ठाणेदार किशोर शेळके, पिएसआय धावळे तसेच पोलीस कर्मचारी रमेश जाधव, संजय घाटोळे, प्रमोद थोरवे, नितीन रवणे, उमेश ठाकरे आदींनी घटनास्थळी समन्वय साधला. तिन दिवस उलटूनही मृतदेहाचा शोध लागलेला नाही.