विदर्भ

शेंदुर्जना चौकीत खाकीचा बाजार ; खोट्या गुन्ह्यांनी त्रस्त जनता, दोषी जमादार

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शेंदुर्जना अढाव पोलीस चौकीत नेमणुकीला असलेला बीट जमादार सध्या चर्चेत आला आहे. खाकीच्या वर्दीचा धाक दाखवत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन नागरिकांकडून उघडपणे अवैध वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या जुलूमशाहीविरोधात ग्रामस्थांनी थेट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेत लेखी निवेदन सादर केले असून या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अवैध धंद्यांना राजाश्रय

सावरगाव कान्होबा, खापरी कान्होबा, चिखलागडसह मानोरा तालुक्यातील अनेक गावे या बिटमध्ये येतात. या गावांमध्ये गुटखा विक्री, मटका-जुगार, वरली यांसारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावले असून त्यामागे पोलीस चौकीतील जमादाराचा थेट राजाश्रय असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. “हप्त्याच्या बदल्यात अवैध धंदे चालू राहतात; हप्ते बंद केले की गुन्ह्याची धमकी सुरू होते,” असा संतापजनक आरोप करण्यात आला आहे.

पावसाळ्यातले खेळ

सध्या पावसाळी दिवस असल्याने गावातील नागरिक चौसरसारखे पारंपारिक खेळ खेळतात. मात्र या निरुपद्रवी खेळावर जुगाराचा ठपका ठेवून थेट कारवाईची धमकी दिली जाते. त्यानंतर पैशाची उघड वसुली केली जाते, असे निवेदनात नमूद आहे. “निरपराध लोकांना हप्त्याच्या जाळ्यात ओढले जाते. नाही दिला पैसा तर सरळ खोट्या गुन्ह्यात अडकवतो,” अशी उघड कबुली नागरिकांनी दिली. परिणामी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संसार उद्ध्वस्त, लेकीबाळींचा प्रश्न

या हप्त्यांच्या आणि दहशतीच्या खेळामुळे अनेक गरीबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लेकीबाळींचे शिक्षण, भविष्य धोक्यात आले असून घराघरात कर्जबाजारीपणाचे ओझे वाढले आहे. “खाकीच्या धाकाने गावकरी गप्प आहेत, पण छातीतील आक्रोश दिवसेंदिवस वाढतोय,” असा उल्लेख निवेदनकर्त्यांनी केला आहे.

आंदोलनाचा इशारा

या सर्व प्रकाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुरेश राठोड यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. निवेदन देताना जमादाराची तात्काळ बदली करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. “कारवाई झाली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू,” असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला. मानोरा तालुक्यातील नागरिकांनीही या निवेदनाला साथ देत जमादाराच्या कारवायांचा पर्दाफाश केला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही