राजकीय दबावाला झुकणाऱ्या पोलिसांना सवाल ; अण्णाभाऊंचा अपमान सहन नाही ; भाई इंगळें

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मातंग समाजाच्या अन्यायग्रस्त कुटुंबीयांनी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे संस्थापक भाई जगदिशकुमार इंगळे यांची भेट घेत समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी हिंगोली रोडवरील जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिला अध्यक्षा मालती गायकवाड यांनी केली. यावर भाई इंगळे यांनी महसूल अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून जागा मिळविण्याची मागणी केली आणि मातंग समाजाच्या पाठीशी संघटना खंबीर उभी राहील, असा ठाम विश्वास दिला.
भेटीदरम्यान अन्यायग्रस्तांनी तक्रार केली की, एका राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली ग्रामीण पोलिसांनी अण्णाभाऊंचे नाव असलेला फलक बेकायदेशीररित्या काढून टाकला. यावर इंगळे यांनी पोलिस व राजकारण्यांना थेट इशारा देत म्हटले की, कोणत्याही दबावाला झुकायचे नाही. अण्णाभाऊंचा अपमान सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास आंदोलन उभारले जाईल.
दरम्यान, श्वेता पडघाने मृत्यू प्रकरणी सादर झालेला अहवाल शंकास्पद असल्याचे कुटुंबीयांनी सांगत त्याला तीव्र आक्षेप घेतला. दोषींवर कारवाई न झाल्यास आरोग्यमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा भाई इंगळे यांनी दिला. श्वेतासाठी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मातंग समाजाचे युवा नेते माधव कांबळे यांनी पंचशील नगरात लहूजी शक्ती सेनेच्या अध्यक्षा विश्रांती खडसे यांच्या मुलावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा उल्लेख करून पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले. अन्यायकारक कारवाई झाली, तर कायदेशीर मार्गाने संघर्ष छेडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
लवकरच मातंग समाजाची राजकीय अस्मिता परिषद होणार असून, समाजाला वापरून टाकणाऱ्या पक्षांविरुद्ध आता आक्रमक विरोध उभारला जाईल. संघटीत होणे ही काळाची गरज आहे, असे भाई इंगळे यांनी सांगितले. या वेळी राजू इंगोले, शालिनी खडसे, गीता तूपसुंदर, मालती गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.