देश -विदेशराजकीय

प्यारे खान यांचा अनोखा उपक्रम ; नेत्यांच्या विजयासाठी अजमेरला हजेरी

राजस्थान | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

अजमेर | राजकीय नेत्यांविषयी असलेले प्रेम आणि निष्ठा अनेकदा त्यांच्या चाहत्यांना व पदाधिकाऱ्यांना वेगवेगळे उपक्रम राबवायला प्रवृत्त करते. अनेकदा हे उपक्रम धार्मिक स्वरूपाचेही असतात. याचाच प्रत्यय शुक्रवारी अजमेर येथे आला. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशासाठी खास धार्मिक उपक्रम पूर्ण केला.

प्यारे खान यांनी याआधीच एक मनोकामना व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत गडकरी विजयी व्हावेत व विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. दोन्ही नेत्यांचा विजय झाल्यानंतर शुक्रवारी त्यांनी अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दरगाह येथे हजेरी लावून चादर चढवून आपली मन्नत पूर्ण केली.

या प्रसंगी प्यारे खान नागपूरहून स्टार एअरवेजच्या नागपूर–किशनगढ फ्लाइटने अजमेरला पोहोचले. त्यांच्यासोबत सुमारे १५० जयरिन होते. सर्वांनी दरगाह शरीफमध्ये उपस्थित राहून सूफी संतांची जियारत घेतली आणि चादर अर्पण केली. यावेळी देशात अमन-शांती, ऐक्य व प्रगतीसाठी विशेष दुआ मागण्यात आली.

या यात्रेत सांगली येथील अशरफ वांकर तसेच इतर सहकारी सहभागी झाले होते. प्रसंगी सलीम सोफी, शारिक पटेल, मौलाना गुफरान, मोहम्मद अली, सरफराज खान, एझाज खान, फैसल शेख, अशरफ खान, सूफियान खान, अतीक अन्सारी, ग्यासुद्दीन अशरफ, इब्राहिम शेख, इरफान खान, राशिद खान, सज्जाद अली, सालार शेख, सलीम अजानी, सय्यद रऊफ, ताज अहमद राजा, हाजी फारूक बावला, इमरान ताजी, मुस्तफाभाई टोपीवाला, वसीम खान यांच्यासह अनेक श्रद्धाळू उपस्थित होते.

गडकरी व फडणवीस हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे प्रभावी नेते असून देशभरात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. विशेषतः नितीन गडकरी हे रोखठोक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे देशातच नव्हे तर विदेशातही त्यांचे चाहते आहेत. त्यांना भेटायला येणाऱ्यांची नेहमीच गर्दी असते. फडणवीस यांनी महाराष्ट्रात मजबूत नेतृत्व दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे.

या पार्श्वभूमीवर प्यारे खान यांनी केलेला हा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे. राजकारणातील आवडते नेते विजयी व्हावेत म्हणून त्यांनी दरगाहवर चादर चढवून मनोकामना व्यक्त केली होती आणि ती पूर्ण झाल्यानंतर आपली प्रतिज्ञा निभावत त्यांनी अजमेर यात्रेला हजेरी लावली. धार्मिक श्रद्धा आणि राजकीय निष्ठा यांचा संगम घडवून आणणारा हा प्रसंग नागपूर व अजमेर या दोन्ही ठिकाणी चर्चेत राहिला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही