मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

५५ फुटांच्या भव्य हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सलगरे नगरी सज्ज

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

मिरज | सलगरे नगरीत भक्तिभाव, वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात ५५ फुटांच्या भव्य, दिव्य श्री हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात रंगणार आहे. शुक्रवार दि. १० ऑक्टोबरपासून ते १४ ऑक्टोबर या कालावधीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, गावभर श्रद्धा व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

सोहळ्याची तयारी उत्साहात

सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सलगरे ग्रामस्थ व आयोजक समितीने एकत्रितपणे कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. ग्रामस्थांच्या श्रमदानातून आणि भाविकांच्या उत्साहातून परिसर मंगलमय वातावरणाने उजळून निघाला आहे. दिवसरात्र सुरु असलेल्या तयारीमुळे संपूर्ण गावच उत्सवी वेष परिधान करत असल्याचे चित्र आहे.

महास्वामीजींचे दिव्य सान्निध्य लाभणार

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सिंहासनाधीश्वर श्री. श्री. श्री. १००८ जगद्गुरू सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी (उज्जयनी महापीठ) यांचे पावन सान्निध्य लाभणार आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार जयंतराव पाटील, माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, विश्वजीत कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

धार्मिक कार्यक्रमांची सांगता

◆ १० ऑक्टोबर : नगरप्रदक्षिणेसह सोहळ्याची भव्य सुरुवात.

◆ ११ ऑक्टोबर : गंगापूजन, अखंड दीपाराधना, हवन, कलशपूजन व सामुदायिक हनुमान चालीसा पठण.

◆ १२ ऑक्टोबर : दिवसभर धार्मिक कार्यक्रम आणि सायंकाळी शिवकीर्तनाचे आयोजन.

◆ १३ ऑक्टोबर : सकाळी दहा वाजता उज्जयनी जगद्गुरू महास्वामीजींच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. सकाळी अकरा वाजता हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. दुपारी धर्मसभा व आशिर्वचनानंतर महाप्रसाद. संध्याकाळी कीर्तन सोहळा रंगणार.

◆ १४ ऑक्टोबर : उपसंहाराचे धार्मिक विधी व भक्तिगीतांनी सजलेला समारोप.

हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी आकर्षणाचा केंद्रबिंदू

सोहळ्याच्या मुख्य दिवशी म्हणजे सोमवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणबिंदू ठरणार आहे. यावेळी हजारो भक्त भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.

भाविकांचा महासागर जमणार

या सोहळ्यासाठी बेळगाव जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील हजारो भक्तांना आमंत्रण देण्यात आले आहे. भाविकनाईंसह अनेक संत-समाजप्रेमी देखील उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

आयोजकांचे आवाहन

“सलगरे नगरीच्या या ऐतिहासिक क्षणाचे प्रत्येकाने साक्षीदार व्हावे, भक्तिभावाने सहभागी व्हावे,” असे आवाहन आयोजक सुरेश हारगे व समिती सदस्यांनी केले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही