कृषी जगतविदर्भ

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमुक्ती करा ; प्रिया अक्षय राऊत यांची मागणी

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

राज्यात अवकाळी पावसाने अभूतपूर्व नुकसान घडवून आणले असून शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. गेल्या २५ वर्षांत इतका पाऊस कधीही पाहायला मिळाला नव्हता. मराठवाडा व विदर्भापुरतेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे तब्बल ८० टक्क्यांहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा प्रिया अक्षय राऊत यांनी राज्य सरकारकडे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.

राज्यातील मंत्री, पालकमंत्री व जनप्रतिनिधी सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत असून नुकसानग्रस्त शेतीचा सर्वेक्षण सुरू आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या अहवालाच्या गोंधळात वेळ न घालवता शेतकऱ्यांना थेट दिलासा देणे आवश्यक असल्याचे प्रिया राऊत म्हणाल्या. त्यांच्या मते, केवळ शासकीय मदत किंवा दिलासा पॅकेज पुरेसे नाही, कारण नुकसानाचे प्रमाण इतके मोठे आहे की शेतकरी कर्जाच्या जोखडातून सुटणार नाही.

“आज प्रत्येक शेतकरी कर्जबाजारी आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या वेदनांना खरी आपुलकी दाखवायची असेल, तर सरळ सरळ कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” असे स्पष्ट मत प्रिया राऊत यांनी व्यक्त केले.

त्यामुळे राज्य शासनाने तातडीने शेतकरीहिताचे धोरण राबवून कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही