
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मानोरा रोडवरील पाटील दूध संकलन केंद्राजवळ आज सकाळी मोठा अपघात टळला. सहारा कॉलनी, गायकवाड नगर व भारत नगर येथून आर. जे. कॉन्व्हेन्टची तेरा मुले घेऊन जाणारी टाटा मॅजिक स्कूल व्हॅन रस्त्याच्या बाजूच्या खोल खड्ड्यात घसरून पलटी झाली. सुदैवाने सर्व मुले सुखरूप बचावली.
अपघाताच्या ठिकाणी चिखल व बाबुडीचे काटे असूनही स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केली. भारत तोडकर व मानव सेवा हेल्पलाइनचे सिकंदर खान यांनी चिखलात उतरून अजून मुले अडकली आहेत का याची खात्री केली. त्या ठिकाणी सापही असल्याने परिस्थिती धोकादायक होती. मेस्कोचे सुरक्षा रक्षक महेंद्र घुडे यांनी तत्काळ श्रीगुरु मंदिर रुग्णवाहिकेचे सेवक रमेश देशमुख यांना माहिती दिली. तसेच सर्वधर्म संस्था अध्यक्ष शाम सवई, सासचे अजय ढोक, शिवनेरी रुग्णवाहिका चालक विनोद खोंड हे घटनास्थळी पोहोचले. सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढून दुसऱ्या व्हॅनने घरी पाठवण्यात आले.
या घटनेनंतर पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवासासाठी निवडल्या जाणाऱ्या वाहनांची फिटनेस तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अनेकदा शालेय वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मुलांना कोंबल्याचे प्रकार आढळतात, ज्यामुळे अशा अपघातांचा धोका वाढतो.
आज कोणतेही अनर्थ टळले असले तरी या घटनेवरून प्रशासनाने धडा घेणे आवश्यक आहे. नागरिकांनीही सजग राहून शालेय वाहनांची स्थिती, परवाने व फिटनेस प्रमाणपत्रांची चौकशी करणे गरजेचे आहे. पालकांचे थोडे अधिक लक्ष आणि प्रशासनाची तपासणी यामुळे भविष्यातील अपघात टाळले जाऊ शकतात, अशी सर्वत्र मागणी होत आहे.