कृषी जगतविदर्भ

मोहरी परिसरात मुसळधार पावसाचा हाहाकार ; शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त

वाशिम | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी परिसरात 26 सप्टेंबरच्या रात्रीपासून व 27 सप्टेंबरच्या दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. या पावसामुळे खडीपोटी, बेलखेड व आसपासच्या शेतांमधील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने शेतात पाणी साचले असून कपाशीचे पीक जमिनीत कोसळले आहे. तर सोयाबीनच्या शेतात पाणी गेल्याने उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांनाही अकाली अंकुर फुटत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.

या वादळी पावसामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर शेतीसाठी लागणाऱ्या साधनांचेही नुकसान झाले आहे. गजानन गावंडे यांच्या शेतातील मोटर पंप व सोलर पॅनल पूर्णपणे उखडून पडल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मोहरी धरण तुडुंब भरल्याने त्याच्या नाल्यातून शेजारील शेतांमध्ये पाणी घुसून पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.

शेतकऱ्यांनी तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने हताश वातावरण आहे. ढगफुटीच्या स्वरूपात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून “जगावे तरी कसे?” असा प्रश्न शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत जाहीर करून आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांकडून होत आहे. या आपत्तीसमोर शेतकरी पुन्हा उभा राहण्यासाठी शासनाची मदत हीच एकमेव आशा असल्याचे चित्र आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही